लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज देशभरात पार पडला. ९१ मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले. या पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशात हिंसाचाराच्या घटना झाल्या. त्यात दोनजण ठार झाले तर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन सोबत छेडछाडीच्या घटना घडल्या. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली माहिती दिली. नागालँड, मिझोरम आणि सिक्किम या ठिकाणी अनुक्रमे ७८ टक्के, ६० टक्के आणि ६९ टक्के मतदान झाले. तर मणिपूरमध्ये ७८.२ टक्के आणि त्रिपुरात ८१.८ टक्के मतदान झाले.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ५५.७८ टक्के मतदान झाले. नक्षल प्रभावित दंतेवाडा याठिकाणी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या भागातही मतदान सुरळीत पार पडल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या अॅपवर सुमारे ७१ हजार तक्रारी आल्या. त्यापैकी ५० हजार तक्रारींची दखल आम्ही घेतली असेही निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले.