News Flash

मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत सर्वात कमी मताधिक्याने विजयी

वरळी आणि शिवडी या मराठी भाषिक भागात अरविंद सावंत यांना मिळालेली आघाडी निर्णायक ठरली.

मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत सर्वात कमी मताधिक्याने विजयी

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार अरविंद सावंत १ लाख मतांच्या फरकाने विजयी झाले असले तरी मुंबईत सर्वात कमी मताधिक्क्याने निवडून आलेली ही जागा आहे. मुंबईचे सहाही लोकसभा मतदारसंघ शिवसेना-भाजपा युतीने कायम राखले. पण दक्षिण मुंबईतून काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्याकडून थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न झाला. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांना ४ लाख २१ हजार ९३७ मते मिळाली. त्यांना एकूण ५२.६४ टक्के मते मिळाली. त्याचवेळी मिलिंद देवरा यांना ३ लाख २१ हजार ८७० म्हणजे ४०.१५ टक्के मते मिळाली. मुंबईतील अन्य मतदारसंघांच्या तुलनेत दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत कमी मताधिक्क्याने विजयी झाले. मुंबईच्या अन्य मतदारसंघात विजयी झालेले शिवसेना-भाजपाचे उमेदवार आणि काँग्रेसच्या मतांमध्ये मोठे अंतर होते.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लोकांनी विश्वास दाखवल्यामुळे मी विजय मिळवू शकलो. आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य आणि उद्धव ठाकरेंचे आशिर्वाद माझ्यासोबत होते असे अरविंद सावंत निकालानंतर म्हणाले.

२०१४ साली सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा १ लाख २८ हजार ५६४ मतांनी पराभव केला होता. आता वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अनिल कुमार यांना ३० हजार ३४८ मते मिळाली. १५,११५ मतदारांनी नोटाचे बटण दाबले. मुंबईच्या जनतेचा कौल आम्ही स्वीकारला आहे. पाचही मतदारसंघात काँग्रेसने अनुभवी आणि लोकप्रिय उमेदवार उभे केले होते. आमच्या उमेदवारांनी भाजपा-शिवसेनेला चांगली टक्कर दिली असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा म्हणाले.

वरळी आणि शिवडी या मराठी भाषिक भागात अरविंद सावंत यांना मिळालेली आघाडी निर्णायक ठरली. दक्षिण मुंबईतील हे दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जातात. शिवडीमध्ये अरविंद सावंत यांना ४९ हजार ८५२ मतांची आणि वरळीत ३६ हजार १५४ मतांची आघाडी मिळाली. मलबार हिलमध्ये अरविंद सावंत यांना ५८ हजार ५६९ मतांची आघाडी मिळाली. हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. कोलाबामध्ये सावंत यांना १८,१२७ मते मिळाली. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात मिलिंद देवरा यांना ३४ हजार ८६९ आणि भायखळयात २८,६७५ मतांची आघाडी मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 6:15 pm

Web Title: lok sabha elections result 2019 south mumbai arvind sawant milind deora
Next Stories
1 सुरतमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सला आग लागून २० जणांचा मृत्यू
2 काँग्रेसची नाचक्की, विरोधी पक्षनेतेपद मिळावं इतकंही संख्याबळ नाही
3 शत्रूसाठी धोक्याची घंटा! भारताने बनवला ५०० किलोचा गाईडेड बॉम्ब
Just Now!
X