लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. देशभरामधील प्राथमिक मतमोजणीचे कल हे एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरवणारेच असल्याचे दिसत आहे. मुंबईमध्येही शिवसेना भाजपा युतीचीच हवा दिसत आहे. मुंबईतील सर्वच्या सर्व सातही मतदारसंघांमध्ये युतीचेच उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

दक्षिण मुंबई मतदारसंघामधून शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आघाडीवर असून त्यांच्या विरोधात उभे असलेले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा पिछाडीवर आहेत. उत्तर मुंबई मतदारसंघामधून उर्मिला मातोंडकर पिछाडीवर आहेत. भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी या मतदारसंघांमधून आघाडी घेतली आहे. भाजपाच्या पुनम महाजन या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघांमधून आघाडीवर असून प्रिया दत्त पिछाडीवर आहेत. याशिवाय उत्तर मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्याऐवजी तिकीट देण्यात आलेले मनोज कोटकही आघाडीवर आहेत. वायव्य मुंबईतून शिवसेनेचे गजानन किर्तीकर आघाडीवर असून दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर आहेत.

हाच कल कायम राहिल्यास मुंबईमध्ये युतीचे सर्व उमेदवार निवडूण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसाठी हा मोठा धक्का असेल असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.