नारायण राणे, अजित पवार किंवा राधाकृष्ण विखे-पाटील हे आपापल्या पक्षांसाठी स्टार प्रचारक आहेत. राष्ट्रवादीच्या प्रचारात अजितदादा पुढे असतात. शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये असताना नारायणरावांना मागणी असायची. विखे-पाटील हे तसे वक्तृत्वात फारशी छाप पाडू शकत नसले तरी विरोधी पक्षनेतेपद असल्याने काँग्रेसने त्यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत टाकले. सध्या हे तिन्ही नेते आपापल्या मतदारसंघांच्या बाहेर प्रचारात फारसे सक्रिय दिसत नाहीत. कारण  त्यांची मुले निवडणूक लढवत आहेत. मुलांचा विजय या तिघांसाठी महत्त्वाचा असल्याने त्यांना मतदारसंघातच ठाण मांडावे लागले आहे. पार्थ पवार यांच्या पहिल्याच भाषणाने  गोंधळ झाला. हे चित्र बदलण्यासाठी अजितदादांनी सारी सूत्रे हाती घेतली आहेत. पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना ते साद घालत आहेत. कोकणात गेल्या वेळी नारायणराव आणि त्यांच्या पुत्राचा पराभव झाला होता. लागोपाठ दुसऱ्यांदा पराभव झाल्यास राणे संपले, असा संदेश जाईल. हे टाळण्यासाठीच राणे यांनी सारी शक्ती पणाला लावली आहे. राणे भाजपचे खासदार असले तरी शिवसेनेच्या विरोधात लढत असलेल्या आपल्या पुत्रासाठी राणे रणांगणात उतरले आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील यांचाही अपवाद नाही. त्यांनाही मुलासाठी लक्ष घालावे लागत आहे. नारायणराव किंवा अजितदादा उघडपणे मुलासाठी फिरत आहेत. विखे-पाटील यांची वेगळीच अडचण आहे. कारण ते अजूनही अधिकृतपणे काँग्रेसमध्ये आहेत.

मेटे सांगा कुणाचे?

सत्ताधारी कोणी असो, काही नेते त्यांना बरोबर चिकटतात. शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे हे त्यापैकी एक. युतीची सत्ता असताना ते मुंडे यांच्याजवळ होते. आघाडीची सत्ता येताच ते राष्ट्रवादीच्या जवळ गेले. राष्ट्रवादीशी घरोबा असताना अजित पवार, आर. आर. पाटील यांच्याशी त्यांचे सख्य होते. राज्यात सत्ताबदल होण्याचे वेध लागले तसे मेटे भाजपच्या जवळ गेले. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना जवळ केले. मुंडे यांच्यानंतर मेटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिकटले. महादेव जानकर, सदा खोत यांना मंत्रिपद मिळाले, पण मेटे यांना काही संधी दिली नाही. ही सल त्यांच्या मनात कायम आहे. त्यांची नाराजी दूर करण्याकरिता शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. भाजपमध्ये मात्र संधी मिळत नव्हती. बीडच्या राजकारणात पंकजा मुंडे यांनी मेटे यांना चार हात दूरच ठेवले. त्यातच राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांना भाजप प्रवेशाचे वेध लागले आहेत. यामुळे मेटे यांचे महत्त्व आपोआपच कमी होणार. हे ओळखून मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला तर राज्यात अन्यत्र भाजपला पाठिंबा जाहीर केला. आता मेटे नेमके कोणाचे असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.