उस्मानाबादमध्ये मतदानाचे चित्रण फेसबुकवर; तर अकोल्यात मतदानयंत्राची तोडफोड

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा जागांसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले. उस्मानाबादमध्ये राजकीय पक्षांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर टाकलेली मतदानाची छायाचित्रे, अकोल्यात मतदाराने फोडलेले मतदानयंत्र, परभणीत पोलिसांच्या जीपवर दगडफेक, काही गावांनी मतदानावर घातलेला बहिष्कार आणि काही ठिकाणी मतदानयंत्रांत बिघाड यांचा अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले.

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात राज्यात ११ एप्रिल रोजी विदर्भातील सात मतदारसंघांत मतदान झाले होते. दुसऱ्या टप्यात गुरुवारी बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या १० मतदारसंघातील १७९ उमेदवांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करण्यासाठी शांततेत मतदान झाले. राज्यातील दहा मतदारसंघांत सरासरी ६३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी गुरूवारी  दिली.

कडाक्याच्या उन्हामुळे सकाळीच मतदार बाहेर पडल्याने अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. मराठवाडय़ातील काही मतदान केंद्रावर मतदानयंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी मतदार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केल्या. त्यामुळे सुरूवातीस काही मतदान केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र वेळीच ईव्हीएम बदलण्यात आल्याने मतदान सुरळीत सुरू झाले. एक -दोन घटनांचा अपवाद वगळता सर्वच मतदारसंघात उत्साहात, सुरळीत मतदान पार पडल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी प्रथमच ८६ मतदान केंद्रावर सर्व महिला अधिकारी, कर्मचारी होते. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान एक अनोखा प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदान करतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकली. एका कार्यकर्त्यांने चक्क आपण मतदान कोणाला दिले याचे ‘फेसबुक लाईव्ह’ केले. मात्र, या प्रकारामुळे मतदानाची गोपनीयता भंग झाल्याने संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले. तसेच फेसबुकवरील पोस्टही काढून टाकण्यात आल्या. आणखी एका घटनेत अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील कवठा गावात श्रीकृष्ण घ्यारे या मतदाराने मतदान करताना ईव्हीएमला विरोध म्हणून यंत्रच तोडून टाकले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी या मतदाराला ताब्यात घेतल्यानंतर नवीन ईव्हीएम लावून मतदान सुरू करण्यात आले. लातूरमध्ये सुनेगाव शेंद्री, हिंगोलीत कळमनुरी तालुक्यातील करवाडी आणि उस्मानाबाद मधील बार्शी तालुक्यातील वानेवाडी अशा काही गावातील लोकांनी प्रशासन आपल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत मतदानावर बहिष्कार टाकला. मतदारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपच्या प्रीतम मुंडे आदींचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.

सोलापुरात ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

सोलापूर : काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या चुरशीच्या तिरंगी लढतीमुळे संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात गुरूवारी ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सायंकाळी पाचपर्यंत ५२.०१ टक्के मतदान झाले होते. शेवटच्या एका तासात बहुतांश मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांची गर्दी उसळली होती.

सायंकाळी पाचपर्यंत एकूण १८ लाख ५० हजार २ मतदारांपैकी नऊ लाख ६२ हजार १५९ इतके मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ५२.०१ टक्के इतकी होती. यात पाच लाख १८ हजार ३७२ पुरूषांनी तर चार लाख ४३ हजार ७७९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याशिवाय आठ तृतीयपंथीय मतदारांनीही मतदान केले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाचा तपशील असा: मोहोळ-एकूण मतदार- तीन लाख २७४६, झालेले मतदान-एक लाख ६६ हजार ९७२ (५५.१५ टक्के), उत्तर सोलापूर शहर-एकूण मतदार-दोन लाख ७८ हजार ८९६, झालेले मतदान-एक लाख ४९ हजार ८४५ (५३.७३ टक्के), सोलापूर शहर मध्य-एकूण मतदार-दोन लाख ९१ हजार ६७४, झालेले मतदान-एक लाख ४५ हजार ५८३ (४९.९१ टक्के), अक्कलकोट-एकूण मतदार-तीन लाख ४१ हजार ९४४, झालेले मतदान-एक लाख ७५ हजार ११६ (५१.२१ टक्के), दक्षिण सोलापूर-एकूण मतदार-तीन लाख ३५०३, झालेले मतदान-एक लाख ५२ हजार ६१५ (५०.२८ टक्के) आणि पंढरपूर-एकूण मतदार-तीन लाख ३१ हजार २३९, झालेले मतदान-एक लाख ७२ हजार २८ (५१.९३ टक्के).

सकाळी मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या दोन तासात मतदान संथगतीने सुरू होते. पहिल्या दोन तासात म्हणजे नऊ वाजेपर्यंत जेमतेम ५.६५ टक्के इतकेच मतदान झाले होते. त्यानंतर अकरा वाजेपर्यंत मतदानाची गती काही प्रमाणात वाढली आणि १६.४८ टक्क्यांपर्यंत मतदानाची मजल गेली. दुपारी एकपर्यंत मतदानाचे प्रमाण ३१.५० टक्क्य़ांपर्यंत पोहोचले होते. तर दुपारी तीन वाजता मतदानाच्या टक्केवारीची स्थिती ४१.३९ पर्यंत होती. त्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेत गती वाढल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शहरातील बुधवार पेठ,मिलिंदनगर, थोरला राजवाडा परिसरात नवबौध्द समाजाच्या मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. दुसरीकडे नई जिंदगी, कुमठा नाका, बेगम पेठ, सिध्देश्वर पेठ, रविवार पेठ, भवानी पेठ आदी भागातही मतदारांमध्ये उत्साह जाणवला. सकाळी काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने मतदारांचा हिरमोड झाला होता. नंतर त्यांच्यात  उत्साह संचारला. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या पत्नी उज्ज्वला शिंदे व कन्य आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह नेहरूनगरातील वसंतराव नाईक प्रशालेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तर भाजपचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथे मतदान केले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी आदींनी  आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन  मतदान केले. नवमतदारांमधील उत्साह प्रकर्षांने जाणवत होता. नवमतदारांबरोबरच काही मतदान केंद्रावर काठी टेकत नव्वदी पार केलेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत आपला उत्साह दाखविला.

सौम्य लाठीमार

मोहोळ तालुक्यात एका मतदान केंद्रावर प्रतिबंधित केलेल्या शंभर मीटरच्या क्षेत्रात अनावश्यक गर्दी झाल्याने त्यात पोलिसांनी हस्तक्षेप केला असता त्यात वाद उफाळला. तेव्हा पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्या वेळी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत ऊर्फ बाळराजे  पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. हा प्रकार  समजताच काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

अकोल्यात भर उन्हातही मतदारांच्या रांगा

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारसंघात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज असून, अधिकृत टक्केवारी रात्री उशिरा स्पष्ट होईल. ५४.७३ टक्के मतदारांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत झाली.

अकोला मतदारसंघातील दोन हजार ०८५ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. मतदारसंघात १८ लाख ६१ हजार ११४ एकूण मतदार असून, सकाळी ७ ते ९ या कालावधीत ७.५६ टक्के मतदान झाले. सकाळच्या सुमारास मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सकाळी ११ वाजेपर्यंत २०.५१ टक्के, तर दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ३४.४२ टक्क्यांवर पोहोचली. दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.३९, तर ५ वाजेपर्यंत ५४.७३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण टक्केवारी ६० पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

११ उमेदवारांचे भाग्य यंत्रबंद झाले आहे. अकोला मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे, वंचित आघाडीचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे हिदायत पटेल यांच्यात तिरंगी लढत आहे. मतदारसंघात गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, भाजपचे उमेदवार संजय धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर, आमदार सर्वश्री गोवर्धन शर्मा, गोपीकिशन बाजोरिया, हरीश पिंपळे, रणधीर सावरकर, विप्लव बाजोरिया आदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

या मतदारसंघात अकोट, बाळापूर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर व वाशीम जिल्ह्यतील रिसोड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. अकोट मतदारसंघात सर्वाधिक मतदान नोंदवण्यात आले. मतदारसंघात सकाळपासूनच मतदानाचा उत्साह दिसून आला. ग्रामीण भागांमध्येही मतदारांनी गर्दी केली होती. लोकसभा निवडणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष उघडण्यात आला होता. त्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, उपजिल्हाधिकारी राजेश खवले आदींसह वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून होते. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विशेष जनजागृती करण्यात आली होती. त्याचा परिणाम दिसून आला. सखी मतदान केंद्र आकर्षणाचा विशेष केंद्रबिंदू ठरले. काही ठिकाणी मतदार यंत्र बिघाडाच्या घटना समोर आल्या.

११ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद ; उमेदवाराच्या मतदार पावत्या

मतदानापूर्वी प्रशासनासह भाजपच्या उमेदवारानेही मतदार पावत्याचे वाटप केले होते. त्या मतदार पावतीवर उमेदवाराचे छायाचित्र, नाव व चिन्हाचा समावेश होता. अनेक मतदार उमेदवाराच्या पावत्या घेऊन मतदान केंद्रावर दाखल झाले. मतदार केंद्राच्या परिसरात त्याला बंदी असतांना कोणीही त्यांना रोखले नाही.

नावे गायब

अकोला मतदारसंघात असंख्य मतदारांची नावे मतदार यादीतून गायब असल्याचे आढळून आले. अनेक मतदारांनी ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी केली होती. मात्र, त्यांची नावे मतदार यादीत आली नाही. त्यामुळे केंद्रावर दाखल होऊनही यादीत नाव नसल्याने असंख्य मतदारांना निराश होऊन परतावे लागले.

कवठा येथे मतदार यंत्र फोडले

अकोला लोकसभा मतदारसंघातील बाळापूर तालुक्यात कवठा येथे श्रीकृष्ण घ्यारे या मतदाराने मतदान यंत्र फोडल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, अशी मागणी त्याची होती.  केंद्रावर दाखल होताच श्रीकृष्ण घ्यारे याने एकच गोंधळ घातला. ईव्हीएम यंत्रावर विश्वास नसल्याचे मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची मागणी केली. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या घ्यारे याने केंद्रातील मतदान यंत्र जमिनीवर आदळले. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. निवडणूक अधिकाऱ्यांनी दुसरे मतदान यंत्र लावून मतदान प्रक्रिया सुरळीत केली.

अपंग म्हणून नोंदच नाही

प्रशासनाकडून बीएलओमार्फत दिव्यांगाची विशेष नोंदणी करण्यात आली होती. त्यांच्यासाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था होती. अकोला मतदारसंघात ५ हजार ०७४ दिव्यांग मतदारांची नोंद आहे. प्रत्यक्षात कितीतरी अधिक पटीने दिव्यांग आहेत. ते केंद्रावर आल्यावर त्यांची दिव्यांग म्हणून नोंद नसल्याचे समोर आले.

नांदेडमध्ये मतदारांचा उत्साह; पाच वाजेपर्यंत ६० टक्के मतदान

नांदेड : राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारसंघात गुरुवारी दोन हजारांहून अधिक केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. काही ठिकाणी मतदान यंत्रात झालेल्या तांत्रिक बिघाडाचे प्रकार वगळता सर्व काही सुरळीतपणे सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले. सायंकाळी पाचपर्यंत ६० टक्के मतदानाची नोंद झाली.

महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातल्या या मतदानासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणेने बुधवारीच संपूर्ण सज्जता केली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी सात वाजता सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला.

मतदानानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे  प्रा. यशपाल भिंगे यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

मंगळवारी नांदेड शहर व जिल्ह्यच्या काही भागात अवकाळी पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही वातावरण ढगाळ होते आणि  उष्म्याची तीव्रता काहीअंशी कमी झाली होती. या वातावरणाचा परिणाम मतदानाच्या दिवशीही कायम होता. उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वीच स्त्री व पुरुष मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचे शहरी भागात दिसून आले. पहिल्या चार तासात नांदेड लोकसभा मतदारसंघात २३ टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या चार तासात ते ५० टक्क्यांच्या जवळपास गेल्याचे सांगण्यात आले. २०१४च्या निवडणुकीत नांदेडमध्ये सरासरी ६० टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानविषयक जागृतीची मोहीम व्यापकपणे राबविल्यामुळे शहरी व ग्रामीण मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. शिक्षण, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी वास्तव्यास असलेले अनेक शहरी व ग्रामीण मतदार मतदानासाठी मुद्दाम आल्याची उदाहरणे अनेक ठिकाणी बघायला मिळाली.

प्रत्येक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारयादीतील घोळ समोर येतो. त्याला ही निवडणूकही अपवाद ठरली नाही. शहरातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदानासाठी गेलेल्या स्त्री-पुरुष मतदारांना आपले नाव यादीत नसल्याचे तेथे गेल्यावरच निदर्शनास आले, त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे दिसून आले. निवडणूक यंत्रणेने मतदान यंत्रात बिघाड झाल्यास राखीव मतदान यंत्रांची व्यवस्था करून ठेवली होती. दिवसभरात ७५ हून अधिक ठिकाणी यंत्रांमध्ये बिघाड झाल्याची नोंद झाली. त्या ठिकाणी यंत्र बदलून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नांदेड शहरात दिव्यांग मतदारांसाठी एक खास मतदान केंद्र उभारण्यात आले होते.त्या केंद्राचा लाभ अनेक मतदारांनी घेतला. महिलांसाठी असलेल्या सखी मतदान केंद्रांवर सर्व जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळली. सिडको भागातील आदर्श मतदान केंद्राला जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व इतर प्रमुख अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधांचा दुष्काळ दिसून आला. मात्र तांत्रिक बिघाड, लहान-मोठय़ा गरसोयी अशा वातावरणातही मतदारांचा उत्साह सायंकाळपर्यंत दिसून आला. ग्रामीण भागात काही केंद्रांवर मोठय़ा रांगा दिसत होत्या. नांदेडमधील मुस्लीमबहुल भागात बहुसंख्य केंद्रांवर मोठय़ा रांगा दिसून आल्या.

बीडमध्ये अंदाजे ६५ टक्के मतदान

बीड : राजकीय पातळीवर प्रचंड संवेदनशील झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५८ टक्के मतदान झाले. उर्वरित वेळेत सर्वसाधारणपणे एकूण ६५ टक्के मतदान होईल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला होता. भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत ३६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून आता कोणाला किती कोणत्या भागात मतदान पडले याची आकडेमोड सुरू झाली आहे.

बीड लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून २ हजार ३३५ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ११ पर्यंत २७ टक्के मतदान झाले होते. दुपारी उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदानाची गती मंदावली. मात्र तीननंतर मतदानाचा वेग वाढत गेला आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५८ टक्के मतदान नोंदवले गेले. अनेक मतदान केंद्रांवर रांगा असल्यामुळे सहा वाजल्यानंतरही काही ठिकाणी मतदान सुरू राहिले आहे.

एकूण २० लाख ४१ हजार मतदार आहेत. भाजप राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावून मतदारांना आकर्षति करण्याचा प्रयत्न केल्याने निवडणुकीत राजकीय वातावरण गरम झाले होते. सकाळी परळी तालुक्यातील नाथ्रा येथे भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, प्रज्ञा मुंडे, यशश्री मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर याच मतदान केंद्रावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही मतदान केले. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आनंदगाव सारणी या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर, पुतणे संदीप क्षीरसागर यांनी नवगण राजुरी येथे तर आमदार विनायक मेटे, माजी मंत्री प्रा.सुरेश नवले यांनी शहरातील केंद्रावर मतदान केले. किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान, दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

देशात ६६ टक्के मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ९५ मतदारसंघांमध्ये सरासरी ६६ टक्के मतदानाची नोंद झाली. पष्टिद्धr(१५५)म बंगाल आणि मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना, देशातील विविध मतदारसंघांत मतदानयंत्रांत बिघाडाच्या घटना वगळता शांततेत मतदान झाले. पुद्दुचेरीमध्ये आणि मणिपूरमध्ये ८० टक्के मतदान  झाले. श्रीनगर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे १५ टक्के मतदान झाले. उधमपूर मतदारसंघांमध्ये ७० टक्के मतदानाची नोंद झाली. तमिळनाडूतील ३९ पैकी ३८ मतदारसंघांमध्ये ७० टक्के मतदान झाले.

राज्ये आणि मतदान

तमिळनाडू : ७० टक्के (३८ जागा), छत्तीसगड : ६९ टक्के (तीन जागा), पश्चिम बंगाल : ७६ टक्के (तीन जागा), उत्तर प्रदेश : ६२.३० टक्के (आठ जागा), ओदिशा : ६४ टक्के (पाच जागा), कर्नाटक : ६१.८४ टक्के (१४ जागा), आसाम : ७३ टक्के (पाच जागा), बिहार : ६२.५८ टक्के (पाच जागा)

सायंकाळी पाच वाजेपर्यंतचे मतदान

बुलढाणा ६२ टक्के, अकोला ५४.४५ टक्के, अमरावती ५५.४३ टक्के, हिंगोली ६०.६९ टक्के, नांदेड ६०.८८ टक्के, परभणी ६२ टक्के, बीड ५८.४४ टक्के, उस्मानाबाद ५७.४ टक्के, लातूर ५७.९४ टक्के आणि सोलापूर ५१.९८ टक्के