सकाळ, सायंकाळच्या प्रचार फेऱ्यांवर उमेदवारांचा भर

मुंबई : कडक उन्हामुळे अनेक उमेदवारांनी मॉर्निग वॉक आणि सायंकाळच्या प्रचार फेऱ्यांवर भर दिला असून दुपारच्या वेळेत लहानशा हॉलमध्ये आणि सोसायटय़ांच्या परिसरात बैठकांवर भर दिला आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे अनेक उमेदवार शुक्रवारी किंवा सोमवारी निवडणूक कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करणार असून मिरवणुकांची जोरदार तयारी सुरू आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले असून अनेकांनी गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रचारास सुरुवातही केली आहे. मात्र अजून त्यात जोर आलेला नाही. उकाडय़ामुळे आणि नोकरदार व व्यावसायिक मंडळी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उपलब्ध होत असल्याने अनेक उमेदवारांनी मॉर्निग वॉक व सायंकाळपासून प्रचार फेऱ्या काढण्याचे नियोजन केले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि उद्यानांमध्ये फिरायला येणारी मंडळी मॉनिंग वॉकच्या वेळी उपलब्ध असतात. त्यावेळी त्यांची भेट घेण्यात येत आहे. बहुसंख्य उमेदवारांनी सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रचाररथांवरून फिरण्यास सुरुवात केली आहे. खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, संजय निरुपम, संजय पाटील आदी नेत्यांनी समूहांच्या बैठका, निवासी सोसायटय़ांमध्ये भेटीगाठी, बैठका यावर भर दिला आहे. अनेक उमेदवार मंदिरे, विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, बौद्धविहार, दर्गे येथे जाऊन दर्शन, प्रार्थना करीत आहेत. पदयात्रांचे प्रमाण तुलनेने अजून कमी आहे.

मुंबईत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ९ एप्रिलपर्यंत आहे आणि शनिवारी व रविवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे शुक्रवारी व सोमवारी अनेक उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांकडून मिरवणुकांची तयारी सुरू आहे.