शिवराज यादव

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा फज्जा उडालेला दिसत आहे. भाजपा सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आमच्या खात्यात जमा झालेच नसल्याचा दावा इचलकरंजीमधील शेतकऱ्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा केली असता त्यांनी भाजपा सरकारच्या कामकाजावर आणि योजनांप्रती निराशा व्यक्त केली. सरकारने अनेक योजना आणल्या पण त्या आमच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन्मान निधी योजनेतील एकही रुपया आम्हाला आजपर्यंत मिळालेला नाही. उलट फॉर्म भरण्यासाठी १०० ते १५० रुपये आम्हाला मोजावे लागले. १२ कोटी शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचा फायदा झाल्याचा दावा सरकार करतं, मात्र प्रत्यक्षात असं काहीच झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

‘सरकार म्हणतं आम्ही सगळं जमा केलं आहे, पण बँकेत चौकशी केली असता अजून जमा केलं नाही म्हणून सांगतात. सोसायटी आणि केडीसी बँकेत चौकशी केली असता वरुन यायचं बाकी असल्याचं सांगतात मग आम्ही विचारायचं कोणाला ? तलाठी कार्यालयात आम्ही फॉर्म भरण्यासाठी गेलो तर ते फॉर्म भरुन घ्यायलाही तयार नव्हते. आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली’, अशी माहिती शेतकरी विजय दत्तात्रय लवटे यांनी दिली आहे.

अजून एका शेतकऱ्याने सांगितल्यानुसार, ‘योजना जाहीर झाली पण एक रुपया जमा झाला नाही. आम्ही स्वत: १०० रुपये खर्च करुन फॉर्म भरले. पण काहीही उपयोग झाला नाही’. योजना जाहीर झाल्यानंतर आम्ही सातबारा काढला. त्यासाठीही पैसे भरावे लागले. त्याशिवाय सातबारा मिळत नाही. सेवा केंद्रात जाऊन फॉर्म भरले पण पैसे अजून आलेच नसल्याचं कारण दिलं जातं’. कोणतीच योजना आमच्यापर्यंत आलेली नाही, फक्त घोषणा केली जाते अशी खंत अजून एका शेतकऱ्याने केली आहे.

दरम्यान फेब्रुवारी महिन्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाखाहून अधिक शेतकरी कुटुबांची नोंदणी झाली असून ७ हजार ४०० शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम जमा केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. पण ही माहिती चुकीची असल्याचा दावा शेतकरी करत आहेत.

काय आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना –
मोदी सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळणार आहेत. पाच एकराच्या आत जमीन असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पाच एकराच्या आत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांत मिळतील. त्यासाठी तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे नोंदणी करावी लागेल. पाच एकराच्या आत जमीन असलेल्या म्हणजेच तलाठ्याकडे असलेल्या यादीतील शेतकऱ्यांनी नाव, गाव, वय, व्यवसाय, खाते क्रमांक, क्षेत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यांसह घोषणापत्र भरून तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे जमा करावे.