-समीर जावळे

कोणतंही कारण न देता मतदार यादीतून माझं नाव वगळण्यात आलं आहे. मतदार यादीतून नाव वगळावे असा कोणताही अर्ज मी दिलेला नाही. तसेच मतदान केंद्रावर जाऊन विचारले असता नाव का वगळण्यात आलं याचं कोणतंही ठोस कारण मला देण्यात आलेलं नाही. आता मतदानाचा हक्क बजावू दिला नाही तर उपोषण करणार असा इशारा अहमदनगरच्या तरूणाने लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना दिला. सचिन म्हस्के असं या तरूणाचं नाव आहे. ते अहमदनगरच्या विनायक नगरमध्ये रहातात. ते आज मतदानासाठी गेले असता तुमचे नाव उमेदवार यादीत नाही ते वगळण्यात आले आहे असं त्यांना सांगण्यात आलं.

याबाबत विचारणा केली असता तुमचे नाव का वगळण्यात आले ते आम्ही अधिकाऱ्यांशी बोलून सांगतो असे सांगण्यात आले आहे. एकीकडे सरकार मतदान करण्याचं आवाहन करत असतं, जाहिरातींवर खर्च करतं मात्र आता माझं नाव का वगळण्यात आलं? याचं काहीही उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. मग सरकारच्या या आवाहनाला काय अर्थ आहे? माझं नाव वगळण्यात का आलं? याचं कोणतंही उत्तर नाही. जर मला मतदानाचा हक्क बजावू दिला नाही तर मी उपोषण करेन आणि माझं मतदान घडवून आणावं यासाठी प्रयत्न करेन असंही म्हस्के यांनी सांगितलं.

एकीकडे कोट्यवधींच्या जाहिराती करून मतदानाचं आवाहन सरकार करतं आहे. दुसरीकडे नाव वगळण्याचा अनुभव मला आहे. या अनुभवाला यंत्रणा आणि प्रशासन जबाबदार आहे असं मी मानतो. माझा कोणताही दोष नसताना मला माझा मतदानाचा हक्क बजावण्यापासून दूर ठेवण्यात येते आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडेही मी दाद मागणार आहे असंही सचिन म्हस्के यांनी सांगितलं.