दहागाव येथील मतदान केंद्रावरील प्रकार

यवतमाळ : हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी आज झालेल्या मतदानाच्या वेळी उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील मतदान केंद्रावर मतदाराच्या बोटाला चक्क तीनवेळा शाई लावण्याचा प्रकार घडला.

उमरखेड शहरापासून जवळच असलेल्या दहागाव येथे सकाळी ७ वाजतापासूनच गावकऱ्यांनी मतदानासाठी गर्दी केली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे सकाळी सात ऐवजी साडेसात वाजता येथील मतदानास प्रारंभ झाला. यावेळी गावातील राजगजेंद्र पुंडलिक जाधव मतदानासाठी गेले होते. मतदान केंद्र क्रमांक १८८ येथे मतदानाची प्रक्रिया पार पाडताना उडालेल्या गोंधळामुळे कर्मचाऱ्याने प्रथम राजगजेंद्र यांच्या उजव्या हाताच्या ‘मध्यमा’वर शाई लावली. ही चूक लक्षात आल्यानंतर या कर्मचाऱ्याने पुन्हा त्यांच्या डाव्या हाताच्या ‘तर्जनी’वर शाई लावली. या गोंधळात राजगजेंद्र यांच्या डाव्या हाताच्या ‘मध्यमा’वर तिसऱ्यांदा शाई लागली.

त्यामुळे या मतदान केंद्रावरील हा प्रकार आज सर्वत्र चर्चेचा विषय होता. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदाराच्या फक्त डाव्या हाताच्या ‘तर्जनी’वर शाई लावण्याचा नियम आहे.

इतर कोणत्याही बोटास शाई लागली असल्यास तो मतदान प्रक्रियेतील गैरप्रकार  ठरतो. त्यामुळे गोंधळामुळे झालेल्या या प्रकारात    प्रशासन  कोणावर कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

उमरखेड विधानसभा मतदारसंघात ६८ टक्के मतदान

हिंगोली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या यवतमाळ जिल्ह्यतील उमरखेड विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६८ टक्के मतदान झाले. मतदानांची अंतिम टक्केवारी रात्री उशिरा स्पष्ट होईल. या मतदारसंघातील उमरखेड आणि महागाव तालुक्यातील २ लाख ८९ हजार ९२ इतके मतदार आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५६.२२ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.