महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज मोठ्या उत्साहात पार पडलं. राज्यभरात १४ मतदारसंघांमध्ये उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद झालं. पुणे, बारामती, मावळ, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, अहमदनगर, माढा अशा महत्वाच्या मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडलं. महाराष्ट्रात ५६ टक्क्यांच्या घरात मतदान पार पडल्यामुळे, निकाल नेमका काय लागणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सकाळपासून बहुतांश मतदान केंद्रांमध्ये मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणुक आयोगाकडून वेळोवेळी पावलं उचलण्यात आली होती, आणि याला मतदारांची चांगला प्रतिसादही दिला. काही मतदारांनी तर परदेशातून खास मतदानासाठी सुट्टी काढून आपलं कर्तव्य पूर्ण केलं.

पुण्यात राहणारे विहंग खोपकर आणि त्यांची पत्नी प्राजक्ता खोपकर यांनी थेट पश्चिम आफ्रिकेतून पुण्यापर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास करत मतदानाचा हक्का बजावला. खोपकर हे पश्चिम आफ्रिकेतील गॅबॉनया येथील ओलेम कंपनीमध्ये कामाला आहेत. देशाबाहेर काम करण्यासाठी खोपकर दाम्पत्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मतदानासाठी आपल्या कंपनीने खास दहा दिवसांची सुट्टी मंजूर केल्याचं खोपकर म्हणाले. सुट्टी मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ भारतात येऊन आमचा मतदानाचा हक्क बजावला. विहंग यांनी पुण्यातील कोथरुडमध्ये, तर त्यांची पत्नी प्राजक्ता यांनी बडोद्यामध्ये मतदानाचा हक्क बजावला.

अनेकदा मतदान न करण्यासाठी लोकं अनेक कारणं देतात. मात्र आपल्या देशाची लोकशाही मजबूत करायची असेल तर प्रत्येकाने मतदान करणं गरजेचं आहे. मी पहिल्यांदाच देशाबाहेर कामासाठी गेलो आहे, पण तरीही मतदान कारयंच हे मी ठरवलं होतं. त्यानुसार सुट्टी दिल्यामुळे आपण आपलं कर्तव्य बजाल्याचंही खोपकर म्हणाले. यावेळी मतदानादिवशी आपल्या अधिकारांचा वापर करुन मतदान करण्याचं आवाहनही खोपकर यांनी केलं.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलियातून मूळगावी परतत ‘त्यांनी’ बजावला मतदानाचा हक्क!