भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रात एकूण ४ टप्प्यात मतदान होणार असून त्यातील शेवटच्या टप्प्यात मुंबई आणि इतर महत्वाच्या भागात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानात प्रत्येकाने सहभागी व्हावे यासाठी निवडणूक आयोग आणि इतर सामाजिक संस्था आपल्या आपल्या पद्धतीने जनजागृती करत आहेत. यातच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानेदेखील सामाजिक भान राखत चौथ्या टप्प्यातील मतदारांना मतदान करण्याचे आग्रहपूर्वक आवाहन केले आहे.

सचिन हा कायम सामाजिक भान राखण्यासाठी कायम अग्रेसर असतो. आजही सचिनने मतदान कराच असा आग्रहपूर्वक संदेश देणारा व्हिडीओ ट्विट केला आहे. ‘२९ एप्रिलला महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या दिवशी सगळ्यांनी घराबाहेर पडा आणि मतदान करा. या मतदानाच्या वेळी केवळ मी आणि अंजलीच नव्हे, तर सारा आणि अर्जुनदेखील मतदान करणार आहेत. त्या दोघांप्रमाणेच तुम्हीदेखील मतदानाचा हक्क बजावा’, असे सचिनने ट्विट करत म्हटले आहे.

सचिनच्या या व्हिडिओबरोबरच सचिनने ‘मतदानाचा हक्क म्हणजे लोकशाहीने आपल्याला दिलेलं गिफ्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाने घराबाहेर पडा आणि मतदान करा’ असं कॅप्शन दिलं आहे.