संतोष प्रधान, बारामती

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत बारामतीच्या निवासस्थानी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी देशातील तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केले. मोदी यांनी केलेली टीका, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भूमिका, राज ठाकरे यांच्याबरोबरील बैठका, भाजप-शिवसेना युती याबाबत सविस्तर मते मांडली.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचे आकर्षण कमी झाले..

२०१४च्या निवडणुकीपूर्वी मोदी यांच्याबद्दल आकर्षण होते. गुजरात म्हणजे विकासाचे मॉडेल हे लोकांच्या मनावर बिंबवले गेले होते. पण गेल्या पाच वर्षांमध्ये लोकांचा भ्रमनिरास झाला. विकास कुठे दिसला नाही. मोदींमध्ये ‘संघ’ भावना दिसली नाही. भाजपचे मंत्रीच भेटायला गेल्यावर तुम्हीच तिकडे जरा बोला असे सांगतात. यावरून मोदी मंत्र्यांना फार महत्त्व देत नाहीत हेच दिसून येते. एका व्यक्तीला राज्य चालविता येऊ शकते, पण देश चालविता येत नाही. वाजपेयी यांच्याप्रमाणे मोदी यांच्याकडे सर्वाना बरोबर घेऊन जाण्याच्या गुणाचा अभाव जाणवतो. मोदी यांनी अनेक आश्वासने दिली, पण ती प्रू्ण होऊ शकली नाहीत. लोक यामुळेच मोदी यांच्यावर नाराज आहेत.

* राहुल गांधी परिपक्व झाले, पण..

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी परिपक्व आणि प्रागतिक झाले आहेत. पक्ष वाढीसाठी ते कष्ट घेतात. आघाडीच्या संदर्भात त्यांची भूमिका चांगली होती. काँग्रेसची भूमिका बदललेली जाणवली. काँग्रेसने यंदा फार ताणले नाही. कारण काँग्रेसची लोकमान्यताच कमी झाली आहे. अहमदनगरच्या जागेवरून काँग्रेसचा काही आक्षेप होता. पण तेथे राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. यामुळे हा मतदारसंघ सोडण्याचा प्रश्नच नव्हता. तमिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष पार कमकुवत झाला आहे.

* राज ठाकरे यांना बरोबर घ्यायला काय हरकत?

राज ठाकरे यांनी सध्या मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. जाहीर सभांमधून ते हीच भूमिका मांडणार आहेत. आघाडीत त्यांना बरोबर घेण्यात काहीच हरकत नव्हती. पण काँग्रेसमधील काही नेत्यांनी विरोध केला. लोकसभा लढणार नाहीत हे त्यांनी जाहीर केले आहे. विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

* भाजप-शिवसेनेची अगतिकता..

भाजप-शिवसेना युती होणार याची शाश्वती होती. उभयतांची ती अगतिकता होती. शिवसेना युती करणार हे पहिल्यापासूनच स्पष्ट होते. शिवसेनेचे मुख आणि मुखपत्राच्या भूमिकेत अंतर होते. दोन्ही पक्ष एकत्र आले तरी फार काही फरक पडणार नाही.

* प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल संशय होताच..

समविचारी मतांचे विभाजन टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीबरोबर यावे, असे प्रयत्न होते. पण त्यांची सुरुवातीपासूनच नकारघंटा होती. १९९८ मध्ये सर्व रिपब्लिकन नेते आघाडीबरोबर आले होते. तेव्हा आठवले, आंबेडकर, गवई आणि कवाडे हे चारही नेते विजयी झाले होते. आंबेडकर यांच्या भूमिकेविषयी आधीपासून संशय होता आणि तो खरा ठरला.

*  पवार कुटुंबीयांमध्ये कसलाही वाद नाही..

माढा मतदारसंघातील आपल्या उमेदवारीवरून चुकीचे चित्र रंगविले जात आहे. मावळ मतदारसंघातून गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाचा उमेदवार पराभूत झाला होता. तेव्हा पवार कुटुंबातील कोणाला तरी उभे करावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. यानुसार पार्थला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. पक्षाचा प्रमुख या नात्याने कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर केला.