नाशिक : देशात सध्या कोणतीही लाट नाही. लाट एकदाच असते. ती परत येत नाही. २०१४ प्रमाणे देशात वातावरण नाही. तेव्हा काँग्रेस सरकारविषयी जनतेच्या मनात राग होता. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाच वर्षांत केलेले काम आणि आगामी काळातील योजना जनतेसमोर मांडाव्या लागतील, असे सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. काँग्रेसप्रमाणे मोदी सरकारविषयी जनतेच्या मनात राग नसल्याची पुष्टी त्यांनी जोडली.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाच वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामांचा निवडणुकीत कस लागेल. काँग्रेस सरकारच्या काळातील दोषांवर बोट ठेवून मते मागता येणार नाही. पुलवामा हल्ला, भारताने पाकिस्तानला दिलेले प्रत्युत्तर आदींमुळे देशवासीयांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. काँग्रेसचे नेतृत्व बालिश व्यक्तीकडे आहे. काँग्रेस आघाडीकडे पंतप्रधानांसाठी अनेक चेहरे इच्छुक आहेत. ही संख्या विरोधकांमधील अस्थिरता दाखवते, असे राऊत यांनी सांगितले. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून पंतप्रधान जातीय मुद्दय़ांचा आधार घेत असल्याच्या प्रश्नावर राऊत यांनी मागील निवडणुकींचा इतिहास कथन केला. देशात जात, धर्म या विषयावर सातत्याने भाष्य झाले आहे. राजकीय सभेत असे होत असते. पंतप्रधानांकडून शरद पवारांवर चढविला जाणारा हल्ला हादेखील तशाच रणनीतीचा भाग आहे. देशाची सुरक्षितता महत्त्वाचा मुद्दा आहे. जेट एअरवेज, बीएसएनएलसह अडचणीत सापडलेले उद्योग बंद पडू नये म्हणून केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित आरोपी मानत नाही’

भाजपने साध्वी प्रज्ञासिंग यांना भोपाळमधून उमेदवारी दिल्याचा परिणाम धुळे मतदार संघात होईल काय, यावर भाजपच्या नेत्यांनी पूर्ण विचारांती तो निर्णय घेतला असेल, असे राऊत यांनी सांगितले. मालेगाव बॉम्ब स्फोटातील संशयित साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यांच्या समर्थनार्थ सर्वात प्रथम शिवसेना मैदानात उतरली होती. त्यांच्या कुटुंबियांची राष्ट्रपतींशी भेट घालून दिली होती. प्रज्ञासिंगसह इतरांना आम्ही आरोप मानत नसल्याचे राऊत यांनी सांगितले.