बिहारमधील पाटणा साहिब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा दोन लाख ८४ हजार ६५७ मतांनी मोठा विजय झाला आहे. विद्यमान खासदार काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवचा धक्का सहन करावा लागला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर ही जागा लढवली होती.

मात्र, पाटणा साहिब मतदार संघातील मतदारांनी सिन्हा यांना नाकारले. सिन्हा या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सिन्हा यांनी वारंवार मोदी यांना लक्ष केले होते. भाजपामध्येही असताना त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.

पाटणा साहिब मतदार संघातून शत्रुघ्न सिन्हा यांना तीन लाख २१ हजार ४० मते पडली आहे. एकूण मतांच्या ३२.८७ टक्के मते सिन्हा यांच्या झोळीत पडली आहे. पोस्टल मतांचा विचार केला असता सिन्हा यांना १००९ मते पडली आहे. भाजपाचे रविशंकर प्रसाद यांनी सहा लाख चार हजार ९५६ मते घेत पाटणा साहिबमध्ये कमळ फुलवले आहे. एकूण मतदानांच्या तब्बल ६१.२५ टक्के मते रविशंकर प्रसाद यांना मिळाली आहे.

पाटणा साहिब हा मतदारसंघ भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ असल्याचे बिहारमध्ये म्हटले जाते. भाजपाचा कोणताही उमेदवार या मतदारसंघातून निवडूण येतो. गेल्या दोन निवडणुकीत सिन्हा यांनी पाटणा साहिब मतदारसंघातून भाजपाकडून विजयी झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून सिन्हा आणि भाजपामध्ये दरार निर्माण झाली होती. अंतर्गत कलहासह अन्य कारणामुळे पक्षश्रेष्ठी सिन्हा यांच्यावर नाराज होते. भाजपाने यंदा रविशंकर यांना विश्वासात घेऊन उमेदवारी दिली होती. त्याचा फायदा रविशंकर यांना झाल्याचा दिसून येत आहे.

एनडीएच्या मोठ्या विजयानंतर सिन्हा यांची वाणी बदलल्याचे दिसले. मोदी माझे चांगले मित्र असल्याची प्रतिक्रिया पराभवानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिन्हा यांनी दिली. त्याबरोबरच त्यांनी रविशंकर प्रसाद यांचे विजयाबद्दल अभिनंदनही केले.