ममता बॅनर्जी यांनी राजकीय फायद्यासाठी पश्चिम बंगालमधील घुसखोरांना वाचवून मातीसोबत विश्वासघात केला आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हवाली करून त्यांनी स्थानिकांच्या अपेक्षांचा भंग केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममदा बॅनर्जी यांच्यावर केली आहे. आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये निवडणुक प्रचारासाठी आले आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी कूचबिहारमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी मोदी यांनी ममता यांच्या ‘माँ-माटी-मानुष’ या घोषणावरही टीकास्त्र सोडलं.

 पश्चिम बंगाल राज्याच्या विकासात ममता बॅनर्जी स्पीड ब्रेकर ठरत आहेत, असा टोलाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. ‘इतर राज्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये गतीने विकास होऊ शकला नाही हे खरं आहे. याचं कारण पश्चिम बंगालमध्ये स्पीड ब्रेकर आहे ज्याला दीदी म्हणून ओळखलं जातं. त्यांना गरिबी हटवायची नाही आहे. जर गरिबी संपली तर त्यांचं राजकारणही संपेल. त्यांना गरिबी पहायची आहे आणि यामुळे त्यांनी गरिबांसाठी सुरु असणारे विकास प्रकल्प थांबवले आहेत’, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. ममता अस्वस्थ झाल्या आहेत. त्या खूप घाबरल्या असून, त्यांची झोप पुरती उडाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या ज्या योजना थांबवल्या आहेत त्यांची यादी मोठी आहे. स्पीड ब्रेकर दीदींनी केंद्राच्या योजना रोखल्या नसत्या तर, आज अनेक योजनांचा तुम्हाला लाभ मिळाला असता. तुम्ही केंद्रात आम्हाला बळकट केलंत तर दीदींना झुकावं लागेल आणि तुमच्यासाठी विकासकामे करावीच लागतील. त्यांची मनमानी आता चालणार नाही, असंही मोदी म्हणाले.