लोकसभा निवडणुकीचे वातावरण सध्या देशभरात चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्षांच्या नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपला प्रचार सुरू केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सात-आठ सभांचे नियोजन करण्यात आले आहे. वर्धा येथील सोमवारच्या सभेनंतर मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतोय, गोंदियात संवाद साधेन असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी ही गरिबहित-विरोधी आघाडी आहे. जनतेशी त्यांची कधीही बांधिलकी नव्हती, ना त्यांच्या नेत्यांची कधी जनतेशी नाळ जुळली. म्हणूनच आज महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे. असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 वर्धा येथील पहिल्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि  राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली होती. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायाला मिळाले होते. आता आज बुधवारच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

विदर्भात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. मोदी यांची पहिली सभा सोमवारी वर्धा येथे झाली. त्यानंतर आता दुसरी सभा बुधवारी गोंदियात होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता बालाघाट रोड टी पार्इंट, बायपास मार्ग परिसरातील अटलधाम मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महाराष्ट्र भाजपा प्रभारी सरोज पांडे, उर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे उपस्थित राहणार आहेत.