भाजपा – शिवसेना युती झाल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे रामटेक मतदार संघातून निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगले. यामुळे काहीसे नाराज झालेल्या आठवले यांनी खास त्यांच्या शैलीत ‘ मन की बात ‘ बोलून दाखवली. तुमची झाली युती आणि आमची झाली माती, असे आठवले यांनी नागपूरमध्ये गडकरींच्या प्रचारसभेत सांगितले.

नागपूर मध्ये नितीन गडकरी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात रामदास आठवले हे देखील उपस्थित होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबई किंवा रामटेक या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. भाजपा आणि शिवसेनेची युती होणार शक्यता त्यावेळी दिसत नव्हती आणि त्यामुळे आठवले समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. खुद्द आठवले यांनी जाहीरपणे या दोन मतदार संघातून निवडणूक  लढवायची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली आणि आठवले यांचे लोकसभेचे स्वप्न भंगले. मंगळवारी नागपूरमधील सभेत त्यांनी ही सल बोलून दाखवली. तुमची झाली युती आणि आमची झाली माती, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली.

नितीन गडकरी विकास पुरुष असून ते सर्वांचे लाडके नेते आहेत. देशात काँग्रेसच्या वतीने भ्रष्टाचार झाला. महायुतीने काँग्रेस विरोधात मोर्चा उघडला. राहुल गांधी सातत्याने आमच्यावर टीका करत आहे. करा तुम्हाला जेवढी करायची असेल नरेंद्र मोदींवर टीका, पचवायची कशी ते माझ्याकडून शिका, असेही त्यांनी सांगितले.

लोकशाहीत तुम्हाला बोलायचं अधिकार आहे. जेवढे तुम्हाला बोलायचं आहे तेवढे बोला, या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी यांचे पोल खोला. गरीबी कशी हटवणार कशी, तुम्ही गरिबांना हटवला. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासोबत होतो, पण तुम्ही माझे सामान बाहेर काढले. मग मी ठरवले की तुम्हाला सत्तेतून बाहेर काढतो, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आठवले यांनी केलेल्या कवितांना नागपूरकरांनी चांगलीच दाद दिली. नाना पटोले यांना इथे यायचे असेल तर येऊ द्या, पण निवडणुकीनंतर पुन्हा गोंदियात जाऊ द्या. असे अवाहन रामदास आठवले यांनी नागपूरातील जनतेला यावेळी केले आहे. आज विदर्भात आले आहे अमित शाह, विदर्भात आम्ही जिंकणार जागा १०. नाना पटोलेकडे वाकड्या नजरेने पाहा आणि सर्वांनी नितीन गडकरींच्या बाजूने रहा, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गडकरींचा प्रचार केला.

विदर्भातील ८ जागांवर गुरुवारी मतदान होणार असून आज मंगळवारी प्रचाराचा शेवट अमित शाह यांच्या सभेने झाला. नागपूरमध्ये अमित शाह यांनी नितीन गडकरी यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत रामदास आठवले यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. आठवले यांनी भाषणाची सुरुवात त्यांच्या शैलीत केली. आठवले म्हणाले, मै नागपूर मे आया हू महायुती को जमाने, चूनके आएंगे कृपाल तुमाने. नितीन गडकरी आहेत माझे जवळचे मित्र, कारण माझ्या ह्रुदयात आहे भीमाचे चित्र.