आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असलेले माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज विधान केलं आहे. भाजपाला रामराम ठोकल्यानंतर सिद्धू यांनी भाजपा नेत्यांवर अनेकवेळा टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी सिद्धू यांनी भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांना लक्ष करताना त्यांची तुलना पावसाळ्यातील बेडकाशी केली आहे. संबित पात्रा हे पावसाळी बेडूकासारखे आहेत. पाऊस येताच ते डरॉव डरॉव करत असतात, असा टोला सिद्धू यांनी लगावला आहे. सिद्धू यांनी एका सभेमध्ये बोलताना भाजपाच्या दिग्गज नेत्यांवर आपल्या शैलित टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाना साधला. या सभेतील एक व्हिडीओ क्लीप सिद्धू यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केली आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘काळे इंग्रज’ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यावर संबित पात्रा यांनी प्रतिउत्तरादाखल म्हटले होते की, मोदी जर ‘काळे इंग्रज’ आहेत तर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी या भारतीय आहेत का?, संबित पात्रा यांच्या या प्रश्नाचा समाचार घेणारं ट्विट सिद्धू यांनी केलं आहे. यामध्ये ते म्हणत आहेत, ‘पावसाळी बेडूक जेव्हा डरॉव डरॉव करत असतो. अशावेळी कोकीळ नेहमीच शांत राहते. आणि कोणी कितीही किंकाळ्या फोडल्या तरी हत्तीही त्याच्या चालीनं चालत राहतो,’

यावेळी सिद्धू यांनी भाजपाच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. मध्यप्रदेशात जेव्हा शिवराज सिंह यांची सत्ता होती, त्यावेळी या राज्यात सर्वाधिक बलात्कार झाले. त्याचवेळी दुसरीकडे मोदी महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारत होते, उज्वला गॅस योजना, निर्भया योजना आणि बेटी पढाव बेटी बचाव यासारख्या योजनांवर टीका केली आहे.