शायना एन सी यांची नाराजी उघड

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत अधिकाधिक महिलांना उमेदवारी द्यायला हवी. महिलांना उमेदवारी देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, महिलांविषयी आदर आणि विश्वास हवा. केवळ घोषणा करून काहीही होत नाही, असा संदेश आपल्याच पक्षाला देत भाजपच्या प्रवक्त्या शायना एन सी यांनी नाराजी व्यक्त केली.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. टीएमसी आणि बीजेडी या पक्षांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याकडे लक्ष वेधत त्यांनी भाजपसह इतर पक्षांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले नसल्याचे सांगितले.

तुमच्या पक्षात राजकीय इच्छाशक्तीची कमतरता आहे, महिलांचा आदर आणि त्यांच्यावर विश्वास टाकला जात नाही, भाजपतर्फे आणखी महिलांना आरक्षण द्यायला हवे असे तुम्हाला वाटते का असे शायना यांना विचारले असता, तुम्ही मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहात, असे सांगत त्यांनी उत्तर देण टाळले.

महाराष्ट्रात लोकसभेच्या २५ जागांसाठी भारतीय जनता पक्षातर्फेच सर्वाधिक म्हणजे २८ टक्के जागा या महिलांना देण्यात आल्या आहेत. यावर शायना यांनी त्यातील अनेक जणी या पक्षातील नेत्यांच्या कन्या असल्याकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या २५ पैकी फक्त सात महिलांना उमेदवारी दिली आहे, ती पुरेशी आहे का? त्यातही पूनम महाजन, प्रीतम मुंडे आणि हीना गावित या पक्षातील नेत्यांच्याच मुली आहेत. तर स्मिता वाघ पक्षातील नेत्याच्या पत्नी आहेत. याला महिलांचे प्रतिनिधित्व म्हणायचे का? नेत्यांच्या कुटुंबातील नेतृत्व करणाऱ्या महिला या  पात्र असतील तर त्यात काही हरकत नाही मात्र इतरांनाही संधी द्यायला हवी, असे शायना म्हणाल्या.