-समीर जावळे

लोकसभा निवडणूक निकालानंतर देशात परिवर्तन घडेल आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ठरवतील तोच पंतप्रधान होईल असं मत अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक संजय सत्रे यांनी व्यक्त केलं. अहमदनगरमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. यावेळी लोकसत्ता ऑनलाईनने इथे नेमकी कुणाची हवा आहे? तसेच निकालानंतर काय चित्र असू शकतं याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माजी नगरसेवक संजय सत्रे यांनी देशात सध्या मोदी लाट नाही तर परिवर्तनाची लाट असून शरद पवार ठरवतील तोच पंतप्रधान होईल असं मत व्यक्त केलं.

सध्या राज्यात असो किंवा देशात असो जनता सरकारच्या जनतेच्या विरोधात आहे. सरकारने जी आश्वासनं दिली होती ती मुळीच पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे जनतेला पुन्हा एकदा राष्ट्रवादीबाबत आणि काँग्रेसबाबत विश्वास वाटू लागला आहे. लोक स्वतःहून मतदानाला येत होती. देशाचा विचार करता देशात मोदी लाट नसून परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे महाआघाडीचं सरकार या देशावर येईल आणि शरद पवार ठरवतील तो पंतप्रधान बसेल असा विश्वास सत्रे यांनी व्यक्त केला.

एवढंच नाही तर अहमदनगरमध्ये मतदार याद्या करताना स्थानिक प्रशासन यंत्रणेने घोळ घातला आहे. अनेकांची नावं मतदार यादीतून गायब होणं. एकाच कुटुंबातील दोन सदस्यांची नावं आधीपेक्षा भलत्याच बूथवर जाणं असे प्रकार घडले आहेत असाही आरोप सत्रे यांनी केला. एकीकडे मतदानाचा टक्का वाढीला लागावा म्हणून प्रशासन प्रचंड खर्च करतं. मात्र दुसरीकडे मतदारांना निराश करण्याचं काम या सरकारी यंत्रणेकडून जाणीवपूर्वक होतं आहे त्याचमुळे मतदार यादीतून नाव गायब होण्याचे प्रकार घडले असाही आरोप सत्रे यांनी केला.