News Flash

अमित शाह यांच्या टीममधले ते पाच ‘चाणक्य’

भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाचे श्रेय मोदी-शाह जोडगळीला देण्यात येत असले तरी संघटनात्मक पातळीवर पडद्यामागे अनेक नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

अमित शाह यांच्या टीममधले ते पाच ‘चाणक्य’

लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार स्थापन करणार आहेत. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या या घवघवीत यशाचे श्रेय मोदी-शाह जोडगळीला देण्यात येत असले तरी संघटनात्मक पातळीवर पडद्यामागे अनेक नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली. कोण आहेत ते नेते त्याबद्दल आपण माहिती घेऊया.

कैलाश विजयवर्गीय
– कैलाश विजयवर्गीय हे मध्य प्रदेशातील भाजपाचे नेते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. मूळचे इंदूरचे असलेल्या कैलाश विजयवर्गीय यांची राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी निवड केली. सहा वेळा आमदार राहिलेले कैलाश विजयवर्गीय कधीही निवडणूक हरलेले नाहीत. शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये ते १२ वर्ष मंत्री होते. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या कैलाश विजयवर्गीय यांच्याकडे संघटना बांधणीचे कौशल्य आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे फारसे अस्तित्व नव्हते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे संघटनात्मक जाळे उभे करण्यात महत्वाची भूमिका बजावली. २०१४ साली हरयाणामधील भाजपाच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर होती. मागच्या दीड वर्षांपासून पश्चिम बंगालचे निरीक्षक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती. राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांनी प्रवास केला.

सुनील बन्सल
– सुनील बन्सल यांच्या कारकिर्दीचा आलेख पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्याशी मिळताजुळता आहे. भाजपामध्ये येण्यापूर्वी दोघे पूर्णवेळ प्रचारक होते. मूळचे राजस्थानचे असलेल्या बन्सल यांची २०१४ मध्ये उत्तर प्रदेशात अमित शाह यांना सहाय्य करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. २०१७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी ते भाजपाच्या कामावर ते लक्ष ठेऊन होते. सपा-बसपा आघाडी झाल्यानंतर उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी त्यांना पुन्हा मदतीसाठी पाठवण्यात आले. कामामध्ये व्यस्त रहाण्याची सवय असलेले बन्सल पक्षातंर्गत मतभेद निर्माण झाल्यानंतर संवाद घडवून आणण्याचे काम करतात. उत्तर प्रदेशात जे भाजपाचे पारंपारिक मतदार नाहीत. अशा मतदारांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सुनील बन्सल यांनी २२ महिन्यांपूर्वीच रणनिती आखली होती. त्यांची ही योजना भाजपामध्येच अनेकांना पटली नव्हती. पण ते उत्तर प्रदेशातील लाखो घरांपर्यंत पोहोचले. ज्याचा फायदा भाजपाला आता झाला.

गोर्धन झाडाफिया
– गोर्धन झाडाफिया मूळचे गुजरातचे असून एकवेळ ते मोदी विरोधक समजले जात होते. २००२ साली त्यांनी भाजपापासून फारकत घेऊन अन्य पक्षांची कास धरली. २०१४ साली त्यांना मोदींकडून फोन गेला त्यानंतर ते पुन्हा भाजपात परतले. गोर्धन झाडाफिया यांच्याकडे संघटना बांधणीचे कौशल्य आहे. त्यांच्याकडे उत्तर प्रदेश सारख्या महत्वाच्या राज्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी आपल्या लौकीकाला साजेसे काम करत भाजपाला उत्तर प्रदेशात ६० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. गोर्धन झाडाफिया यांनी जास्त गाजावाजा न करता अत्यंत अचूकपणे आपली भूमिका बजावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतूनच ते तयार झाले आहेत. मोदी सरकारच्या सर्व योजनांची त्यांनी सविस्तर यादी तयार केली. सुनील बन्सल यांच्यासह ते उत्तर प्रदेशातील दुर्गम गावांमध्ये पोहोचले.

सतीश वेळणकर
– सतीश वेळणकर हे भाजपाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र, राजस्थान, गोवा आणि गुजरात या पश्चिम भारतातील महत्वाच्या राज्यांची जबाबदारी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने राजस्थानात २५ पैकी २५, गुजरातमध्ये २६ पैकी २६, महाराष्ट्रात २५ पैकी २३ आणि गोव्यात एका जागेवर विजय मिळवला.
पॉलिटिकल सायन्स विषयात पदवी मिळल्यानंतर ७० च्या दशकात सतीश वेळणकर आरएसएसचे प्रचारक बनले. त्यांची कर्नाटकमध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि २००० साली भाजपाच्या संघटनात्मक सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेशिवाय कन्नड, बंगाली, आसामी भाषा ते बोलू शकतात.

भूपेंद्र यादव
– भूपेंद्र यादव अमित शाहंच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. भूपेंद्र यादव यांना आरएसएसची पार्श्वभूमी नाही. अमित शाह यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. अमित शाह यांचा स्वत:चा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत संपर्क असतो. निवडणुकीसाठी रणनिती आखण्याची भूपेंद्र यादव यांची जी पद्धत आहे त्याने अमित शाह प्रभावित झाले. भूपेंद्र यादव यांनी नितीन गडकरींसोबत काम केले आहे. गडकरींच्या शिफारसीवरुन त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. २०१५ मध्ये गुजरातेत भाजपामध्ये अंतर्गत लढाई सुरु होती. त्यावेळी आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. २०१७ मध्ये गुजरातेत पाटीदार आंदोलनाचे भाजपा समोर आव्हान होते. प्रस्थापित सरकारविरोधात एक लाट होती. त्या कठीण परिस्थितीतही गुजरातमध्ये भाजपाचे सरकार पुन्हा आणण्यात भूपेंद्र यादव यांची महत्वाची भूमिका होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 1:24 pm

Web Title: loksabha election result 2019 amit shah team five bjp leaders who play imp role
Next Stories
1 तुमच्या नेतृत्वाखाली भारत मोठी उंची गाठेल, विराट कोहलीकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन
2 आपला पराभव होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं – राजू शेट्टी
3 काँग्रेसची नाचक्की; १७ राज्यांमध्ये भोपळाही फोडता आला नाही
Just Now!
X