काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल गांधींच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. राहुल गांधींनी चांगली कामगिरी केली हे काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सर्वांनी त्यांना सांगितले. कोणीही त्यांच्या नेतृत्वावर शंका घेतलेली नाही. सध्याच्या परिस्थिती जर कोणी काँग्रेसचे नेतृत्व करु शकते तर ते राहुल गांधी आहेत असे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. राहुल गांधींच्या नेतृत्वावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही. राष्ट्रीय स्तरावर कोणी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावू शकतात तर ते राहुल गांधी आहेत असे गुलाम नबी आझाद म्हणाले.

गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करावे असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी किंवा अन्य कुठल्याही नेत्याने बैठकीत म्हटलेले नाही असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला आणि गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले.

गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करावे असा राहुल गांधींनी प्रस्ताव मांडल्याची चर्चा होती. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आझाद आणि सूरजेवाला यांनी अशा कुठल्याही प्रस्तावावर चर्चा झाली नाही हे स्पष्ट केले. काँग्रेसची कामगिरी खूप वाईट होती हे मला मान्य नाही. आम्ही अपेक्षेनुसार कामगिरी करु शकलो नाही. आम्ही यावर सविस्तर चर्चा करु असे काँग्रेसचे नेते ए. के. अँटोनी म्हणाले.

आम्ही जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य करतो. आमच्यावर १२ कोटी पेक्षा जास्त लोकांनी विश्वास ठेवला त्याचा आम्ही आदर करतो असे सूरजेवाला म्हणाले. लोकशाहीत जय-पराजय होत असतो पण नेतृत्व करणे वेगळी बाब आहे. आम्ही पराभव मान्य करतो. हा संख्येचा पराभव आहे विचारधारेचा नाही असे गुलाम नबी आझाद म्हणाले.