पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने पूर्ण बहुमत मिळवल्यानंतर आता शपथविधी सोहळ्याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी सोहळ्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण देणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. २०१४ साली पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताना नरेंद्र मोदी यांनी सर्वच सार्क देशाच्या प्रमुखांना निमंत्रित केले होते.

त्यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफही होते. पाकिस्तान सुद्धा सार्कचा सदस्य आहे. मोदींच्या निमंत्रणाला मान देऊन नवाझ शरीफ त्यावेळी शपथविधीसाठी भारतात आले होते. शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी मोदींबरोबर चर्चाही केली होती. भारत-पाकिस्तानमध्ये शांतता नांदावी हा त्या चर्चेमागे उद्देश होता. पण पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या भूमिकेमुळे पाच वर्षात संबंध पार बिघडले.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. मोदी यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भारताने पाकिस्तानमध्ये दोन मोठे स्ट्राइक केले. पाकिस्तानच्या दहशतवादाला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सध्या दोन्ही देशातील संबंधांमध्ये तणाव आहे. काल पंतप्रधान मोदी यांच्या विजयानंतर इम्रान खान यांनी टि्वट करुन मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

दक्षिण आशियात शांतता, समृद्धता आणि विकासासाठी आपल्याला मोदींसोबत काम करायचे आहे असे इम्रान यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते. पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मोदींनी इम्रान यांचे आभार मानताना मी सुद्धा दक्षिण आशियात शांतता आणि विकासाला प्राधान्य दिले आहे असे म्हटले.

मोदींना इम्रान यांनी शुभेच्छा दिल्या असल्या तरी काल भारतात निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच पाकिस्तानने अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. आंतरराष्ट्रीय विषयाच्या जाणकारांनी भारतासाठी हा एक संदेश आहे यादृष्टीने या क्षेपणास्त्र चाचणीचे विश्लेषण केले.