२०१४ पाठोपाठ २०१९ च्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्षांनी धडाकेबाज कामगिरी केली. महाराष्ट्रासह देशभरात आश्वासक कामगिरी करत भाजपने यंदा ३०० चा आकडा ओलांडत नवीन विक्रम केला आहे. या विजयानंतर सर्व स्तरातून मोदी आणि भाजपवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना, लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर विश्वास बसत नाहीये. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर राज ठाकरेंनी, अनाकलनीय…अशा एका शब्दात निवडणुक निकालांचं विश्लेषण केलं आहे.

अवश्य वाचा – मोदींविरोधात दंड थोपटणारे प्रकाश राज सपशेल आपटले, केवळ २ टक्के लोकांचा पाठींबा

लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार उतरवले नव्हते. मात्र मोदींच्या विरोधात राज ठाकरेंनी महाराष्ट्रात आठ ठिकाणी सभा घेत, विरोधाचं वातावरण तयार केलं होतं. राज यांच्या प्रचारसभांना प्रसारमाध्यमांनी चांगली प्रसिद्धीही दिली. ए लाव रे तो व्हिडीओ असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपच्या अनेक योजनांनी पोलखोल केली. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये चित्र संपूर्णपणे वेगळं दिसलं.

ज्या-ज्या ठिकाणी राज ठाकरेंनी मोदींच्याविरोधात सभा घेतल्या तिकडे युतीचे उमेदवार ही आघाडीवर होते. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभांचा यंदाच्या मतमोजणीवर परिणाम होईल ही शक्यता पूर्णपणे फोल ठरली. लोकसभा निवडणूकीनंतर काही महिन्यातच राज्यात निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंची मनसे काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.