गरीबांप्रमाणेच अल्पसंख्यांकाचाही छळ झाला. एक काल्पनिक भय निर्माण करुन त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. मतपेटीच्या राजकारणासाठी त्यांचा वापर झाला. मुस्लीमांचा विश्वास मिळवणं हेच आता लक्ष्य आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण करताना म्हणाले.

त्यांच्या शिक्षणाची, जीवनमान सुधारण्याची चिंता असती तर बरे झाले असते. आपल्याला हा छळ संपवायचा आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सुराज्य आणि गरीबी मुक्तीसाठी लढायचे आहे. मत देणारे आणि विरोध करणारेही आपलेच आहेत. विकास यात्रेत कोणीही मागे सुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे मोदी म्हणाले.

२०१४ ते २०१९ दरम्यान आम्ही गरीबांसाठी सरकार चालवले. २०१९ मध्ये या देशातील गरीबानीच हे सरकार बनवले असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

… अन् मोदी संविधानासमोर नतमस्तक झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली असून निवड झाल्यानंतर मोदी हे संसदीय सभागृहातील संविधानासमोर नतमस्तक झाले. भारताच्या लोकशाहीला आपल्याला समजून घ्यावे लागेल. भारतातील मतदारांना तुम्ही कोणत्याही मापदंडात मोजू शकत नाही. सत्तेच्या मानसिकतेचा मतदार स्वीकार करत नाही, असे मोदींनी म्हटले आहे.

संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यापूर्वी मोदींनी संविधानाला नमन केले. भाषणातही मोदींनी याचा उल्लेख केला. मी संविधानाला नमन केले. लोकप्रतिनिधींमध्ये कधीही भेदभाव करता येणार नाही. जे आपल्यासोबत आहेत किंवा भविष्यात आपल्यासोबत येतील, आपण त्यांच्यासाठी काम करतोय, असे त्यांनी नमूद केले.