उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्यात अटीतटीचा सामना सुरु आहे. प्रत्येक फेरीच्या मतगणनेनंतर आकडे सातत्याने बदलत आहेत. सध्या स्मृती इराणींनी राहुल गांधींना मागे टाकत ११,२२६  मतांची आघाडी घेतली आहे.

अमेठी लोकसभा मतदारसंघ गांधी घराण्याचा बालेकिल्ला समजला जातो. पण यावेळी इथून विजयाची खात्री नसल्यामुळे राहुल गांधींनी अमेठीच्या बरोबरच केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. वायनाडच्या तुलनेत अमेठीमध्ये स्मृती इराणींनी राहुल गांधींसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

२०१४ मध्ये स्मृती इराणींनी राहुल गांधींना अमेठीमध्ये कडवी लढत दिली होती. त्यांनी राहुल गांधींचे विजयाचे मताधिक्क्य मोठया प्रमाणात कमी केले होते. पराभवानंतरही त्यांनी अमेठी सोडली नाही. मागची पाच वर्ष त्या अमेठीमध्ये त्या सक्रीय होत्या. तिथल्या मतदारांच्या संपर्कात होत्या. २००९ मध्ये राहुल गांधी अमेठीमधून २ लाख ७० हजार मतांनी जिंकले होते. २०१४ मध्ये हेच त्यांचे विजयाचे मताधिक्क्य फक्त १ लाख राहिले होते.