देवेंद्र गावंडे

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस महाआघाडीच्या छातीत धडकी भरेल एवढी हवा निर्माण केली आहे. नागपूर सोडून सोलापुरात दलित उमेदवाराविरोधातच निवडणुक का लढवता येथपासून ते केंद्रात पाठिंबा द्यायची वेळ आली तर काँग्रेस की भाजपला निवडणार अशा अनेक प्रश्नांबाबत अ‍ॅड. आंबेडकर यांच्याशी साधलेला संवाद.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Congress Sangli, Sangli Lok Sabha,
सांगलीत काँग्रेसचा लागोपाठ दुसऱ्यांदा विचका, वसंतदादांच्या घराण्याच्या अस्तित्वाचा प्रश्न
sangli
सांगलीच्या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ; निवडणुकीवर बहिष्कार अथवा बंडखोरीची मागणी
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम

* असे काय घडले की विरोधी पक्षांसोबत आपण जाऊ नये, असे तुम्हाला वाटले?

आंबेडकर – देशभराचे राजकारण जर पाहिले तर माझ्यासारखे अनेक पक्ष काँग्रेससोबत जाण्यात इच्छुक होते. परंतु आज महाराष्ट्रात सीपीआय, सीपीएम, दिल्लीमध्ये आपसारखे संघटनसुद्धा काँग्रेससोबत नाहीत. बिहार, झारखंड व मध्य प्रदेशमध्येही असेच चित्र आहे.

* हे खरे असेल तर मग तुमचा नक्की शत्रू कोण?

आंबेडकर- आज काँग्रेसला भाजपने ब्लॅकमेल केले आहे. त्यामुळे या पक्षाने आपली भूमिकाच बदलली आहे. २०१७ मध्ये सीताराम येचुरी यांच्या पुढाकाराने एक फाम्र्युला ठरला होता. त्यानुसार, २०१९ मध्ये काँग्रेसने बॅकफुटवर राहावे आणि २०२४ला काँग्रेसमधील तीन माणसे जी स्वच्छ प्रतिमेची आहेत त्यांनी मोदींविरुद्धच्या या लढय़ाचे नेतृत्व करावे. पण, दुर्दैवाने ते झाले नाही. आजही परिस्थिती भाजपच्या बाजूने नाही. पण, ते जिंकताहेत याचा आभास निर्माण करण्यात ते यशस्वी ठरत आहेत.

* महाराष्ट्रात तुमच्याशी आघाडीचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते. परंतु नंतर वंचित बहुजन विकास आघाडी एकटी पडली. शेतकरी संघटना, सीपीआय, सीपीएम, जनता दलाला तुमच्यापेक्षा काँग्रेससोबत जावे असे का वाटले?

आंबेडकर – डावे माझे आंदोलनातले मित्र आहेत. पण, ते निवडणुकीतले मित्र कधीच झाले नाहीत. आमचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत. आजचे विचाराल तर वंचित बहुजन आघाडी जुलैपासून काँग्रससोबत तडजोडीच्या तयारीत होती. परंतु काँग्रेसने गांभीर्याने घेतले नाही.

* या तिहेरी लढतीचा फायदा भाजपला होणार का?

आंबेडकर – अजिबात नाही.

* तुमच्या विश्वासार्हतेबाबत नेहमी टीका होते. तुम्ही अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करता, हा आरोपही केला जातो.

आंबेडकर – मागच्या निवडणुकीत आम्ही लढलोच नाही तर फायदा कुठून झाला? लढलो नाही कारण मोदींची लाट होती. पण काँग्रेसने समझोता केला असता तर एवढा परिणाम महाराष्ट्रात तरी झाला नसता. लाटा कशा थोपवायच्या हे मला माहिती आहे. आता आम्ही मोदींची लाट थांबवली आहे. अनेक मतदारसंघात भाजपची लढाई वंचित बहुजन आघाडीशी असल्याची चर्चा आहे. मी काँग्रेसला सांगायचो, ‘वुई आर नॉट इंटरेस्टेड इन पार्लिमेंन्टरी इलेक्शन’ आम्ही विधानसभा लढू. आम्ही ज्या बारा जागा मागतोय त्या केवळ वंचितांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. गोंदियात प्रफुल्ल पटेल, सांगलीत सातव, नांदेडमध्ये अशोक चव्हाण लढणार नव्हते. या जागा आम्ही मागितल्या.  काँग्रेसला तेही मान्य नव्हते.

* भाजपने राष्ट्रीयत्व तर काँग्रेसने सरकारच्या निष्क्रियेतला निवडणूक मुद्दा केला आहे. तुम्ही या दोन्हीला बाजूंना सारून वंचित जातींच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवू पाहताय. मग बाकी मुद्दे महत्त्वाचे नाहीत?

आंबेडकर- राष्ट्रवादाच्या मुद्दय़ावर आम्ही संघाला आव्हान देऊन बसलो. ते सांस्कृतिक राष्ट्रवाद सांगतात आम्ही भौगोलिक किंवा संविधानिक राष्ट्रवादालाबद्दल बोलतो. या मुद्दय़ावर खुल्या चर्चेची त्यांची तयारी नाही. कारण, सांस्कृतिक राष्ट्रवादाला मर्यादाच नाहीत. हीच तर त्यांची मनुवादी संस्कृती आहे.

* तुम्ही मनुवादी विचारधारेच्या विरोधात आहात तर मग तुम्ही नागपुरात गडकरींना आव्हान का दिले नाही? सोलापूरला दलित उमेदवाराच्या विरोधात का?

आंबेडकर- मला नागपुरातील आव्हान फार मोठे दिसत नाही. कारण, तेथे तीन लाख मुस्लीम व तितकेच दलित आहेत. सव्वा लाख आदिवासी आणि हलबा आहेत. यातील १७ लाख मतदारांपैकी ११ लाख भाजपच्या विरोधात आहेत. त्यामुळे तेथे माझी गरज नाही. राहिली गोष्ट सोलापूरची, तर मला सोलापूर यासाठी महत्त्वाचे वाटले कारण पंढरपूरमध्ये धनगरांचा उठाव झाला आहे. ७० वर्षे तो काँग्रेस, भाजपच्या पाठीशी राहिला. पंढरपूरमध्ये पहिल्यांदा त्यांनी अधिवेशन घेऊन मी आता सत्ताधारी होणार असा संकल्प घेतला आहे.

* सुरुवातील तुमच्या नावाला राजकीय स्वीकाहार्यता का लाभली नाही?

आंबेडकर- याचे कारण राजकारण्यांना वाटते मी रामदास आठवले व जोगेंद्र कवाडे झालो पाहिजे. म्हणजे मी केवळ दलित नेताच राहिलो पाहिजे. राष्ट्रीय नेता व्हायचा प्रयत्न केला तर तो अपराध ठरतो. पण, आता मी हा दलितपणा ओलांडला आहे.

* निकालानंतर पाठिंबा द्यायची वेळ आली तर काँग्रेस की भाजप?

आंबेडकर- आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबर जाणार. भाजपशी तडजोडीचा प्रश्नच नाही. पण, त्याहीपुढे एक सांगतो भाजपला बहुमत मिळणार नाही. काँग्रेसही शंभरच्या आत थांबेल. अशा स्थितीत प्रादेशिक पक्षच महत्त्वाची भूमिका बजावतील. या क्रमात वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने आम्ही तिसरा पर्याय देत आहोत.

* जातीअंताची लढाई लढणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनीच आपल्या उमेदवाराच्या नावासमोर जाती लिहिल्या, अकोल्यात अर्ज भरायला जाताना गळ्यात कवडय़ांच्या माळा घातल्या, या दोन्हीकडे आंबेडकरांची पत्नी म्हणून तुम्ही कसे पाहता?

अंजली आंबेडकर –  जेव्हा आपण क्लास आणि जेंडर या गोष्टींचा विचार करतो तेव्हा प्रत्येक पक्षाने किती महिला उमेदवारांना जागा दिल्या याची चर्चा होते. याच धर्तीवर जेव्हा तुम्ही नाकारलेल्या जातींना प्रतिनिधित्व देताय तर त्या जाती नेमक्या कोणत्या हे सांगायला नको? त्यामुळे यात मला विरोधाभास दिसत नाही. राहिली गोष्ट कवडय़ांच्या माळांची तर एक सांगते, अर्ज भरताना कुठल्याही समूहाने उत्साहाने गळ्यात काही घातले तर ते काढणे योग्य नाही. कारण, तो शेवटी लोकांच्या भावनेचा विषय असतो.