News Flash

माझी प्रतिमा ४५ वर्षांच्या तपश्चर्येतून तयार

‘इंडियन एक्स्प्रेस’ समुहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

|| राजकमल झा आणि रविश तिवारी

‘इंडियन एक्स्प्रेस’ समुहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

ल्युटेन्स दिल्ली किंवा खान मार्केटमधील उच्चभ्रू वा बुद्धिवंतांनी माझी प्रतिमा तयार केलेली नाही, तर गेल्या ४५ वर्षांच्या तपश्चर्येनंतर चांगली किंवा वाईट जी काय आहे ती माझी प्रतिमा तयार झाली, असे रोखठोक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘एक्स्प्रेस वृत्तसमूहा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मोदी यांनी पाच वर्षांचा सरकारचा कारभार, राहुल गांधी यांच्याकडून होणारे आरोप, नोटाबंदी, आर्थिक धोरणे, परराष्ट्र धोरण, नक्षलवाद, पाकिस्तान, माध्यमांची जबाबदारी या साऱ्या प्रश्नांचा वेध घेतला . मध्य प्रदेश, राजस्थान किंवा छत्तीसगड या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमधील पराभवामुळे शेतकऱ्यांना अनुदान, प्राप्तिकराची सवलत पाच लाखांपर्यंत वाढविणे वा असंघटित कामगारांना निवृत्तिवेतन हे निर्णय घेण्यात आलेले नाहीत. या निर्णयांबद्दल गेली दोन वर्षे तयारी सुरू होती. एका पराभवामुळे हे सारे निर्णय झालेले नाहीत, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सैन्यदल ही मोदींची वैयक्तिक मालमत्ता नाही, अशी ओरड सुरू केल्यानेच आपण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी विराट या युद्धनौकेचा कुटुंबीयांबरोबर सहलीसाठी केलेल्या वापराचा मुद्दा निदर्शनास आणून दिला. मला राजीव गांधी यांचे नाव घ्यायचे नव्हते. पण नाइलाजाने घ्यावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या सरकारच्या काळात सर्वच क्षेत्रांमध्ये भरीव कामे झाली. महागाई निर्देशांक आटोक्यात आला. जगातील सर्वात गतिमान अर्थव्यवस्था झाली, असेही मोदी यांनी सांगितले.

आम्ही सब का साथ, सब का विकास हे धोरण कृतीत आणले. त्याची जाहिरातबाजी केली नाही. जे काही सरकारी आहे त्याची जबाबदारी कोणाचीच नाही ही मानसिकता बदलून जनतेमध्ये उत्तरदायित्वाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही आमची राष्ट्रवादाची व्याख्या आहे.

मी सुट्टीवर जात नाही किंवा सुट्टी घालविण्यासाठी दौरे केलेले नाहीत. मी ऊर्जा किंवा पाण्याच्या संदर्भातील कार्यक्रमांना हजेरी लावल्यास तेवढय़ाच विषयांशी संबंधात भाषण करतो किंवा मते मांडतो. विकासाचे प्रश्न वगळता मी मतप्रदर्शन करीत नाही. प्रचाराचा अपवाद वगळल्यास मी विरोधी नेत्यांच्या विरोधात कधीही मतप्रदर्शन करीत नाही. फक्त कोणी माझ्या विरोधात काही विधान केले असल्यास त्याला नाईलाजाने उत्तर द्यावे लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 1:18 am

Web Title: loksatta interview with narendra modi
Next Stories
1 सहाव्या टप्प्याचे आज मतदान
2 आयुष्मान भारत योजनेची प्रशंसा सुमित्रा महाजनांना पडली महागात! समोर आला डॉक्टरांचा रोष
3 मोदीजी तुम्हाला थप्पड मारली तर माझा हात मोडेल-ममता बॅनर्जी
Just Now!
X