निवडणूक म्हटल्यावर प्रचार हा आलाच. त्यातही लोकसभेची निवडणूक असल्यास देशातील बड्या नेत्यांना देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन प्रचार करावा लागतो. त्यातही दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये प्रचार करताना तेथील स्थानिकांशी संवाद साधताना दुभाष्याचा आधार घ्यावा लागतो. अनेकदा बड्या नेत्यांची हिंदीमधील भाषणे उपस्थितांपर्यंत पोहचवताना दुभाषिकांचीही चांगलीच भंबेरी उडते. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींबरोबर. केरळमधील एका सभेतील राहुल गांधींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

केरळमधील पथनामत्तीता येथे राहुल गांधींनी मंगळवारी प्रचारसभा घेतली. मात्र केरळमधील उपस्थितांशी संवाद साधताना राहुल यांना मल्याळम दुभाषिकाची मदत घ्यावी लागली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी.जे कुरियन यांनी यावेळी दुभाषिकाचे काम केले. मात्र भाषणामध्ये कुरियन यांना राहुल यांची वाक्येच ऐकू येत नव्हते. राहुल आणि कुरियन यांच्यातील या मजेशीर संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हायरल होत आहे. अनेकदा कुरियन यांना न ऐकू गेलेली वाक्ये राहुल गांधीनी त्यांच्या कानात सांगितल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. यावरुन अनेक मीम्सही तयार झाले असून अनेकांनी राहुल यांच्याबरोबर कुरियन यांचीही मस्करी केली आहे. भाषांतरामधील चुकांबरोबर कुरियन यांचे मंचावरील हावभाव आणि वागणेही मजेदार होते. अनेकदा त्यांना राहुल गांधी काय बोलले हेच समजत नव्हते तर कधी त्यांनी माईक एकीकडे ठेऊन दुसरीकडेच बोलायला सुरुवात केली.

या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी मांडलेले अनेक मुद्दे तांत्रिक अडचणीमुळे ऐकू न आल्याचे सांगत कुरियन यांनी चांगलाच गोंधळ घातल्याचे दिसले. राहुल गांधीना अपेक्षित असलेल्या वाक्याच्या अगदी उलट वाक्य कुरियन यांनी मल्याळममध्ये भाषांतर करुन उपस्थितांपर्यंत पोहचवली. उदाहरणार्थ…

>
राहुल गांधी: काँग्रेस आरएसएस आणि भाजपाविरुद्ध लढत आहे.
कुरियन यांचे भाषांतर: काँग्रेस भाजपा आणि सीपीएमविरुद्ध लढत आहे.

>
राहुल गांधी: सीपीएमसारख्या पक्षाच्या विचारसरणीचा आदर करतो.
कुरियन यांचे भाषांतर: सीपीएम आणि भाजपाच्या विचारसरणीचा आदर करतो

>
राहुल गांधी: गरिबांच्या खात्यामध्ये ७२ हजार रुपये जमा करु.
कुरियन यांचे भाषांतर: गरिबांच्या खात्यामध्ये ७२ कोटी रुपये जमा करु.

एकीकडे राहुल गांधी यांची या व्हिडिओवरुन मस्करी केली जात असताना काहींनी या अशाप्रसंगीही राहुल यांनी कुरियन यांच्यावर न संतापता भाषण सुरु ठेवल्याबद्दल त्यांचे कौतूक केले आहे. तर अनेकांनी हा व्हिडिओ म्हणजे मनोरंजनाची संपूर्ण हमी असं म्हणतं शेअर केला आहे.

राहुल गांधीना सभेमध्ये अशाप्रकाराचा अनुभव येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी मार्च महिन्यामध्येही कन्याकुमारी येथील सभेमध्येही त्यांना असाच अनुभव आला होता. या सभेमध्ये के. व्ही थंगबालू यांनी राहुल यांच्या भाषणाचे तमीळ भाषेत भाषांतर करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र त्यांनी राहुल यांच्या भाषणाचा अगदीच चुकीचा अर्थ उपस्थितांपर्यंत पोहचवला. उदारणार्थ राहुल यांनी ‘…म्हणून आम्हाला तामिळनाडूच्या लोकांबद्दल आदर आहे’ हे वाक्य म्हटले. या वाक्याचे भाषांतर थंगबालू यांनी ‘नरेंद्र मोदी हे तामिळ लोकांचे शत्रू आहेत’ असे केले होते.

दरम्यान केरळमधील लोकसभेच्या २० जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.