News Flash

माढय़ातील हवेचा अंदाज आल्यानेच राष्ट्रवादीच्या कप्तानाची माघार

रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे पाणी व रेल्वे प्रश्नासाठी ही निवडणूक लढवत आहेत.

माढय़ातील हवेचा अंदाज आल्यानेच राष्ट्रवादीच्या कप्तानाची माघार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर टीका

वाई : आमचे नेते नरेंद्र मोदी कप्तान म्हणून आघाडीला उतरले आहेत. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कप्तान कोठे आहेत. माढय़ातील हवेचा अंदाज बघूनच राष्ट्रवादीच्या कप्तानानेच निवडणुकीतून माघार घेतली आहे. माढा मतदार संघातील फलटण, माण-खटावसह इतर विधानसभा मतदार संघातील विकासाची भूक कायमची मिटवण्यासाठी भाजपला साथ द्या, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना माढय़ातून भरघोस मतांनी निवडून आणा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे झालेल्या जाहीर सभेत केले.

माढा लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी फलटण येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाषराव देशमुख,  सदाभाऊ  खोत, आमदार नारायण पाटील, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. बाबुराव माने, माजी आ. दिलीप येळगांवकर, दिगंबर आगवणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, उत्तमराव जानकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते

फडणवीस म्हणाले, की माढा लोकसभा मतदार संघातून मोठय़ा प्रमाणावर काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेतेमंडळींनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी खोटी आश्वासने देऊन थापा मारण्याचे राजकारण केले आहे. पण या भागाचा विकास काहीच झाला नाही. माढा मतदार संघातील अनेक प्रश्न जैसे थे आहेत. आम्ही जनतेच्या हिताचे व विकासाचे राजकारण करतो. त्यामुळे आम्ही मोठय़ा प्रमाणात विविध सिंचन प्रकल्पांना व योजनांना मोठय़ा प्रमाणावर निधी देऊन त्या योजना पूर्णत्वाकडे नेलेल्या आहेत. निरा-देवघर कालव्याच्या हक्काचे पाणी निश्चितच फलटण-माळशिरस तालुक्याला मिळेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत गोरगरिबांसाठी मोठे काम केले आहे. आज देश विकासाच्या मार्गावर आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे पाणी व रेल्वे प्रश्नासाठी ही निवडणूक लढवत आहेत. त्यांना ताकद देण्याचे काम आम्ही करणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2019 2:52 am

Web Title: madha lok sabha constituency cm devendra fadnavis beg vote for ranjeet singh naik nimbalkar
Next Stories
1 ‘राष्ट्रवादी’ नाव केवळ धुळफेक करण्यासाठीच?
2 अनंत गितेंकडून आचारसंहितेचा भंग
3 गडचिरोलीतील चार केंद्रांवरील मतदान रद्द
Just Now!
X