महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात अनेक प्रचारसभा घेतल्या. या प्रचार सभांना प्रचंड गर्दीही झाली. मात्र विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच यंदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या गर्दीचे परिवर्तन मतांमध्ये झाले नाही. राज यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ची चांगलीच चर्चा झाली होती. तरी याचा परिणाम मतदानावर झालेल्याचे चित्र मतमोजणीदरम्यान दिसत नाही. राज यांनी सभा घेतलेल्या सर्व १० मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपा युतीचेच उमेदावर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

राज यांनी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान १२ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान राज्यभरामध्ये एकूण १० सभा घेतल्या. यामध्ये नांदेड (१२ एप्रिल), सोलापूर (१५ एप्रिल), कोल्हापूर (१६ एप्रिल), सातारा (१७ एप्रिल), पुणे (१८ एप्रिल), महाड (रायगड) (१९ एप्रिल), काळाचौकी (मुंबई) (२३ एप्रिल), भांडुप (पश्चिम, मुंबई) (२४ एप्रिल), कामोठे (पनवेल) (२५ एप्रिल) आणि नाशिक (२६ एप्रिल) या सहा ठिकाणी सभा घेतल्या होत्या. यासभांद्वारे त्यांनी मोदी-शाह जोडगोळीवर जोरदार हल्ला चढवला होता. राज यांच्या सभांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नक्कीच फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या चार तासांमध्ये हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या सर्वच जागांवर शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदावरांना आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. राज यांनी सभा घेतलेल्या बहुतेक सर्वच जागांवर महाआघाडीचे उमेदवार पिछाडीवर आहेत.

शिवसेनेच्या प्रताप चिखलीकर यांनी काँग्रेसच्या अशोक चव्हाणांना मागे टाकले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही अशोक चव्हाण यांनी नांदेडची जागा राखली होती. त्यावेळी काँग्रेसला नांदेड आणि कोल्हापूर या फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. अशोक चव्हाण यांचा ८१ हजार मतांनी विजय झाला होता. त्यांना ४ लाख ९३ हजार मते पडली होती तर भाजपच्या दिगंबर पाटील यांना ४ लाख ११ हजार मते पडली होती. सोलापुरमध्येही काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पिछाडीवर आहेत. सोलापूरमध्ये भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी हे आघाडीवर असून त्या खालोखाल सुशीलकुमार शिंदे आणि तिसऱ्या क्रमांकावर बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आहेत.

१६ एप्रिल रोजी कोल्हापूरमध्ये राज यांनी सभा घेतली होती. या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे संजय महाडिक आघाडीवर असून राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक दुसऱ्या स्थानावर आहेत. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांची आघाडी असली तरी हा राज यांच्या सभेचा परिणाम नसून उदयनराजेंच्या लोकप्रियतेला जनतेने दिलेले कौल असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. १७ एप्रिल रोजी राज यांनी साताऱ्यामध्ये सभा घेतली होती. १८ एप्रिलला पुण्यामध्ये राज यांनी सभा घेतली तेथे भाजपाच्या गिरीश बापट यांनी ५० हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली असून काँग्रेसचे मोहन जोशी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. राज यांनी सभा घेतलेल्या रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अटीतटीची लढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या येथून शिवसेनेचे केंद्रिय मंत्री अनंत गिते आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आहेत. दक्षिण मुंबईम मतदारसंघामधील काळाचौकी येथे राज यांनी २३ एप्रिल रोजी सभा घेतली होती. येथून शिवसेनेचे सध्याचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आघाडीवर असल्याचे चित्र दिसत असून दुसऱ्या स्थानावर काँग्रेसचे मिलिंद देवरा आहेत.

उत्तर मुंबई मतदारसंघातील भांडुप येथे राज ठाकरे यांनी २४ एप्रिल रोजी सभा घेतली होती. येथून भाजपाचे मनोज कोटक आघाडीवर आहेत. पनवेलमधील कामोठे येथे राज यांनी २५ एप्रिल रोजी सभा घेतली होती. मावळ मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या पार्थ पवार यांना या सभेचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र येथून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आघाडीवर असून येथे पवार कुटुंबासाठी धक्कादायक निकाल समोर येऊ शकतो. राज यांनी २६ एप्रिल रोजी लोकसभेच्या प्रचारादरम्यान शेवटची सभा नाशिकमध्ये घेतली होती. काही वर्षांपूर्वी पालिकेमध्ये सत्ता असणाऱ्या राज यांच्या सभेचा येथे परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र येथून शिवसेनेचे उमेदवार तुकाराम गोडसे आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ दुसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळेच राज यांनी सभा घेतलेल्या एकाही मतदारसंघामध्ये काहीच फरक मतदारांवर झालेला नाही.