नाशिक : लोकसभा निवडणूक मतमोजणी केंद्रात इलेक्ट्रॉनिक गॅझेटसह भ्रमणध्वनीला बंदी असतानाही स्मार्ट घडय़ाळाचा वापर करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांला ताब्यात घेण्यात आले. संशयित कार्यकर्त्यांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील अंबड वेअर हाऊस परिसरात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी झाली. प्रशासनाच्या वतीने मतमोजणी केंद्रात उमेदवार तसेच त्यांच्या समर्थकांनी काय खबरदारी बाळगावी, काय करावे आणि काय करू नये याविषयी मतमोजणीपूर्वी स्पष्ट सूचना दिल्या होत्या.  मतमोजणी केंद्रात भ्रमणध्वनी वापरण्यास बंदी असतानाही भाजपच्या तुकाराम जोंधळे (२९, रा. दिंडोरी) या कार्यकर्त्यांने भ्रमणध्वनीऐवजी स्मार्ट घडय़ाळाचा वापर केल्याचे आढळले. कार्यकर्ता स्मार्ट घडय़ाळाचा वापर करून बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना माहिती देत होता. हा प्रकार लक्षात येताच अंबड पोलिसांनी त्याला अटक करत मतदान केंद्राच्या आवारातील कार्यकर्त्यांना कडक शब्दात सूचना केल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मनाई नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.