काँग्रेस, राष्ट्रवादी कार्यालयांमध्ये निराशा,

नाशिक : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर निकालाच्या उत्सुकतेमुळे गुरुवारी सकाळपासूनच घराघरांमध्ये दूरचित्रवाणी संचासमोर बसून भाजप की काँग्रेस या चर्चेत अनेक जण गुंतले असताना एकेक कल जाहीर होऊ लागताच शहरातील भाजप-सेना पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा जल्लोश सुरू झाला. तर काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला. दुपापर्यंत राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचे कुलूप उघडण्याचीही तसदी घेण्यात आली नसल्याचे दिसून आले.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रारंभीच्या फेऱ्यांमध्ये नाशिक मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ पिछाडीवर असल्याचे समजल्यानंतर राष्टवादी पक्ष कार्यालयाचे कुलूपही उघडण्यात आले नाही. काही कार्यकर्त्यांनी भुजबळ फार्म गाठले. पक्ष कार्यालयात केवळ सुरक्षासेवक आणि बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले पोलीस कर्मचारी यांची एकमेकांना सोबत राहिली. निकालावर चर्चा करण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना आल्या पावली भुजबळसाहेबांच्या बंगल्याचा रस्ता धरावा लागत होता. राष्टवादी महाआघाडीसोबत असलेल्या काँग्रेस पक्ष कार्यालयातही काही वेगळे चित्र नव्हते. सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे पक्ष कार्यालय सुरू करण्यात आले. काही मोजके पदाधिकारी येऊन गेले. शहराध्यक्ष शरद आहेर, बबलू खैरे, सुरेश मारू हे पदाधिकारी कार्यालयातील दूरचित्रवाणी संचावरील निकालाविषयी चर्चा करत होते. आहेर यांनी निकाल अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. समाजातील कुठलाच घटक असा नाही की ज्याने सरकारविषयी नाराजी व्यक्त केली नाही. महिला, युवती, नोकरदार, शेतकरी, व्यापारी, विविध समाजाचे घटक यांनी मोर्चाच्या माध्यमातून सरकारविषयी नाराजी व्यक्त केली. मग ही नाराजी मतपेटीतून का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित करीत ही मंडळी मतदान करताना संमोहित होतात की काय, अशी शंका आहेर यांनी उपस्थित केली.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष कार्यालयांमधील परिस्थितीच्या उलट चित्र भाजप आणि शिवसेनेच्या कार्यालयात होते. भाजप कार्यालयात निकाल पाहण्यासाठी कार्यकर्त्यांकरिता खास एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. कार्यकर्त्यांच्या आदरतिथ्यासाठी पिण्याचे पाणी आणि चहाची व्यवस्था होती. सर्वच मंडळी पक्षाच्या आघाडीच्या चर्चेत गुंतले होते. यावेळी आमदार, उपमहापौरांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक-दिंडोरीत अधिकृत विजयाची घोषणा झाली की दणक्यात आतशबाजी करायची, यावर काहींचे एकमत झाले.

काही उत्साही कार्यकर्त्यांनी आमदार देवयानी फरांदे, पक्षाचे राज्य पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना पेढे भरविले. सावजी यांनी भाजपचा विजय होणार हे निश्चित असले तरी याची तयारी पाच वर्षांपासून सुरू होती, असे सांगितले. मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यापासून तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचण्याची आमची धडपड राहिली. या धडपडीचे फलित निकालात आहे. जनमत आमच्या बाजूने आल्याचे सावजी यांनी नमूद केले.

राज्यात अनेक ठिकाणांसह नाशिक मतदारसंघातही शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर असल्याचे लक्षात आल्यानंतर पक्षाच्या शालिमार येथील कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजेपासूनच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची वर्दळ सुरू झाली. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी वाहने पक्ष कार्यालयापासून दूर लावावी, अशी सूचना आणि इशारा कार्यकर्त्यांना दिला. पक्षाच्या कार्यालयात सचिन मराठे, महेश बडवे हे दोन्ही महानगरप्रमुख, वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी निकालाची चुरस दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून अनुभवत असतांना मताधिक्य कितीचे असेल यावर चर्चा रंगली. काही मंडळी भ्रमणध्वनीवरूनच एकमेकांना विजयासाठी अभिनंदन करण्यात मग्न राहिले. दुपारनंतर संपर्क प्रमुखांसह अन्य पदाधिकारी पक्ष कार्यालयात येणार असल्याचे मराठे यांनी सांगितले. दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल, पण विजय आमचाच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बडवे यांनी शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच नियोजनास सुरूवात झाली होती, असे सांगितले.