सोलापूर लोकसभा मतदार संघात चुरशीची तिरंगी लढत आहे. यात भाजपाचे उमेदवार सिद्धेश्वर महाराज हे आघाडीवर आहेत. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपाचे सिद्धेश्वर महाराज यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सिध्देश्वर महास्वामी ६१ हजार ८४६ मते घेऊन प्रथम स्थानप आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या सुशील कुमार शिंदे यांना ४४ हजार १३४ मते मिळाली आहे. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर असून त्यांना १८ हजार २५२ मते मिळाली आहेत.

पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघावर भाजपने पकड बसविली आहे. मागील २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी शिंदे तयारी करीत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीने शिंदे यांची डोकेदुखी वाढली होती. सोलापूरची निवडणूक ही पूर्णत: जातीय वळणावर गेली असून, जातीय समीकरणावरच तिन्ही उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

भाजपने लिंगायत धर्मगुरू डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना निवडणूक मैदानात उतरवून शिंदे यांच्यासमोर अडचणी निर्माण केल्या असतानाच शेवटच्या क्षणी अकोल्याबरोबर सोलापुरातूनही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे सोलापूरचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे एकाच वेळी डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान पेलताना शिंदे यांच्यासाठी यंदाची ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरली आहे.

सोलापूरात सुमारे अडीच लाख मतदार असलेला मुस्लीमवर्ग काँग्रेस की वंचित बहुजन आघाडी, अशा दोलायमान स्थितीत दिसतो. १८ लाख ५० हजार मतदारांमध्ये लिंगायत- ३.५० लाख, पद्मशाली- ३ लाख, दलित- ३ लाख, मराठा व मुस्लीम प्रत्येकी अडीच लाख, धनगर- २ लाख व इतर- २ लाख अशी ढोबळ स्वरूपाची जातनिहाय मते आहेत.