Maharashtra Lok Sabha Election : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे कल हाती आले असून केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार बहुमताने सत्तेत आलं आहे. एकीकडे केंद्रात भाजपा सरकार येणार की काँग्रेसला सत्ता मिळणार याची उत्सुकता असताना महाराष्ट्रात मतदारांनी काय कौल दिला आहे याकडेही अनेकांच्या नजरा होत्या. महाराष्ट्रातही भाजपा-शिवसेना युतीला आघाडी मिळाली आहे. लोकसभा निवडणूक म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधीची रंगीत तालीम आहे असं म्हटलं जात होतं. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशात पुन्हा एकदा मोदी सरकारची हवा आहे असं स्पष्ट झालं आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून राज्यात चार टप्प्यात मतदान पार पडलं होतं. ११ एप्रिलला ७, १८ एप्रिलला १०, २३ एप्रिलला १४ आणि २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान पार पडलं होतं. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अटीतटीची लढत झाली असून अनेक धक्कादायक निकाल हाती आले आहेत विशेष म्हणजे यावेळी वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. वंचित बुहुजन आघाडी सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवत होते. प्रकाश आंबेडकर यांनी पराभव मान्य केला असून ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

एकीकडे शिरुर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी विजय मिळवत सर्वांना धक्का दिला तर मावळमधून पार्थ पवार यांचा पराभव झाला आहे. अशोक चव्हाण यांच्या पराभवानेही आघाडीला धक्का बसला आहे.

दुसरा एक मह्त्त्वाचा मुद्दा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधात प्रचार करुन देखील भाजपा-शिवेसेनेला कोणताही तोटा झाला नाही. राज ठाकरेंच्या प्रचारामुळे युतीच्या जागा कमी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. राज ठाकरे यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना अनाकलनीय अशी एका शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

Live Blog

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स येथे वाचा

Highlights

    20:02 (IST)23 May 2019
    दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी

    दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले असून काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव झाला आहे.

    19:26 (IST)23 May 2019
    राज ठाकरेंचा फायदा उचलण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी अपयशी

    राज ठाकरेंचा फायदा उचलण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी अपयशी ठरलं आहे. राज ठाकरेंनी तयार केलेल्या वातावरणात आघाडीचे कार्यकर्ते अपयशी ठरले आहेत अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिली आहे.

    19:07 (IST)23 May 2019
    सांगली मतदारसंघातून संजयकाका पाटील विजयी

    सांगली मतदारसंघातून संजयकाका पाटील विजयी

    17:59 (IST)23 May 2019
    मुंबई ईशान्य मतदारसंघातून मनोज कोटक विजयी

    मुंबई ईशान्य मतदारसंघातून भाजपा उमेदवार मनोज कोटक विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा तब्बल 226486 मतांनी मनोज कोटक यांनी पराभव केला आहे.

    17:52 (IST)23 May 2019
    अहमदनगरमधून सुजय विखे विजयी

    अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांचा विजय झाला आहे. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने ही लढाई प्रतिष्ठेची ठरली होती. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांचा पराभव केला आहे. दोन लाखांहून अधिक मताधिक्य त्यांनी घेतलं आहे.

    17:49 (IST)23 May 2019
    नंदुरबारमधून हिना गावित विजयी

    नंदुरबार मतदारसंघातून भाजपाच्या हिना गावित विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या के सी पाडवी यांचा हिना गावित यांनी तब्बल 95629 मतांनी पराभव केला आहे.

    17:27 (IST)23 May 2019
    उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री मातोश्रीवर

    उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि रामदास आठवले मातोश्रीवर पोहोचले

    17:13 (IST)23 May 2019
    विजयानंतर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

    17:07 (IST)23 May 2019
    निकालांचं राज ठाकरेंकडून एका शब्दात विश्लेषण, म्हणाले….

    २०१४ पाठोपाठ २०१९ च्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्षांनी धडाकेबाज कामगिरी केली. महाराष्ट्रासह देशभरात आश्वासक कामगिरी करत भाजपने यंदा ३०० चा आकडा ओलांडत नवीन विक्रम केला आहे. या विजयानंतर सर्व स्तरातून मोदी आणि भाजपवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना, लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर विश्वास बसत नाहीये. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर राज ठाकरेंनी, अनाकलनीय…अशा एका शब्दात निवडणुक निकालांचं विश्लेषण केलं आहे.

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

    16:32 (IST)23 May 2019
    यापुढे निवडणूक लढवावी की नाही, असा प्रश्न - नारायण राणे

    लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजयी आघाडी घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निकाल धक्कादायक असून विश्वासार्हता गमावली आहे. यापुढे निवडणूक लढवावी की नाही, असा प्रश्न पडला आहे. निवडणुकीत हेराफेरीची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

    16:21 (IST)23 May 2019
    मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर मुख्यमंत्र्यांचं समर्थकांसह जंगी सेलिब्रेशन

    16:18 (IST)23 May 2019
    उर्मिला मातोंडकर यांच्याकडून गोपाळ शेट्टींचं अभिनंदन

    मी अनेक रडीचे डाव खेळू शकते पण माझ्या त्यावर विश्वास नाही. राजकारणापासून लांब जाण्याचा माझा कोणताही विचार नाही. एक महिन्यापासून मी खंबीरपणे उभी होते आणि लढा दिला. मला माझा पराभव मान्य आहे - उर्मिला मातोंडकर

    16:14 (IST)23 May 2019
    वंचित आघाडीचा फटका काँग्रेस- राष्ट्रवादीला

    नागपूर ब्युरो चिफ देवेंद्र गावंडे यांनी केलेलं विश्लेषण

    16:00 (IST)23 May 2019
    विरोधकांनी जनतेचा कौल खुल्या मनाने स्विकारला पाहिजे - नितीन गडकरी

    निवडणुकीदरम्यान अनेक मुद्दे येतात. विरोधकांनी जनतेचा कौल खुल्या मनाने स्विकारला पाहिजे, हीच लोकशाही आहे. लोकशाहीत एका पक्षाला बहुमत मिळतं, तर दुसऱ्याला विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याची संधी मिळते असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

    15:57 (IST)23 May 2019
    पार्थ पवारांचा पराभव हा घराणेशाहीचा, मक्तेदारीचा - गिरीश बापट

    पुण्यातील विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच शहारतील सर्व खासदार आमदार पदाधिकारी विविध क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते या सर्वाचा हा विजय आहे. तसेच बारामतीत दिलेला कौल आम्ही स्विकारतो. मात्र मावळमध्ये पार्थ पवारांचा पराभव हा घराणेशाहीचा, मक्तेदारीचा मतदारांनी केलेला पराभव आहे : गिरीश बापट

    15:19 (IST)23 May 2019
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
    15:16 (IST)23 May 2019
    सेन्सेक्सचा ऐतिहासिक उच्चांक; पहिल्यांदाच ४० हजारांच्या पार; केक कापून सेलिब्रेशन
    15:11 (IST)23 May 2019
    शिरुरमध्ये अमोल कोल्हेंनी मारली बाजी

    शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले अमोल कोल्हे यांनी बाजी मारत धक्कादायक निकाल दिला आहे. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांचा दणदणीत पराभव केला आहे. शिवाजीराव अढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंची जात काढल्याने चर्चा रंगली होती. यानंतर अमोल कोल्हे यांनी मी शिवाजी महाराजांचा मावळा असल्याचं उत्तर दिलं होतं.

    15:01 (IST)23 May 2019
    ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात संशयाचं भूत: शरद पवार

    लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत संशयाच भूत असून यापूर्वी नरसिंहराव, राजीव गांधी यांचा देखील भरघोस मताधिक्याने विजय झाला होता, पण त्यावेळी ईव्हीएमवर शंका उपस्थित झाल्या नव्हत्या.  पण यंदा प्रथमच ईव्हीएमबाबत शंका उपस्थित होत आहेत: शरद पवार

    14:59 (IST)23 May 2019
    सुप्रिया सुळेंनी राखला बारामतीचा गड

    कांचन कुल यांचा पराभव करत सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखला आहे. यामुळे बारामती जिंकण्याचं भाजपा-शिवसेनेचं स्वप्न भंगलं आहे. बारामतीसाठी भाजपाने सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. पण विजय मिळवत सुप्रिया सुळे सलग तिसऱ्यांदा खासदारपदी निवडून आल्या आहेत.

    14:54 (IST)23 May 2019
    तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची, भाजपा महाराष्ट्राकडून ट्विट
    14:38 (IST)23 May 2019
    जनतेचा कौल आमची झोप उडवणारा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठी आघाडी मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहेत. जनतेचा कौल आमची झोप उडवणारा असून आता आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही जे प्रयत्न करत होतो ते आता वाढवणं गरजेचं असून, जनतेसाठी जास्त मेहनत करावी लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

    14:14 (IST)23 May 2019
    सुप्रिया सुळेंचा विजय निश्चित

    बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यामुळे बारामती जिंकण्याचं भाजपा-शिवसेनेचं स्वप्न भंगलं आहे. बारामतीसाठी भाजपाने सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती.

    14:08 (IST)23 May 2019
    मतदार हा राजा आहे, त्यांनी दिलेला निर्णय मान्य - प्रकाश आंबेडकर

    लोकसभा निवडणुकीचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मतदार हा राजा आहे, त्यांनी दिलेला निर्णय मान्य असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा बॅलेट पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरु होणं गरजेचं असून त्यासाठी विरोधकांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. विरोधी पक्षांनी ठोस भूमिक घेतल्याशिवाय बॅलेट मतदान परत सुरु होणार नाही असं ते म्हणाले आहेत.

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

    13:48 (IST)23 May 2019
    मावळमध्ये पार्थ पवार यांचा पराभव होण्याची शक्यता

    मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पिछाडीवर असून श्रीरंग बारणे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पार्थ पवार 1 लाख 83 हजार 884 मतांनी पिछाडीवर आहेत. श्रीरंग बारणे यांना 587401 मतं मिळाली असून पार्थ पवार 403517 मतांनी पिछाडीवर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील 61265 मतांनी तिसऱ्या स्थानावर आहेत.

    13:40 (IST)23 May 2019
    नगरमध्ये विखेंना एक लाख ५० हजारांची आघाडी

    अहमदनगर मतदारसंघात भाजपाचे सुजय विखे सातत्याने आघाडीवर आहेत. एक लाख ५१ हजार दोनशे १९ मते घेत सुजय विखे यांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना 222308 मते मिळाली आहेत. तर सुजय विखे यांनी 373527 मते घेत आघाडीवर आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाकडून दिलीप गांधी खासदार म्हणून निवडून आले होते.

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

    13:19 (IST)23 May 2019
    अमरावतीत नवनीत राणा यांची आघाडी

    अमरावती मतदारसंघातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ पिछाडीवर असून नवनीत राणा यांनी आघाडी घेतली आहे. नवनीत राणा 218539 मतांनी आघाडीवर असून आनंदराव अडसूळ यांना 209626 मतं मिळाली आहेत.

    13:17 (IST)23 May 2019
    सुशीलकुमार शिंदे यांना प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीचा मोठा फटका

    सोलापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा मोठा फटका काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना बसत आहे. एकूण १० लाख ८१ हजार ३८६ मतदानापैकी ४ लाख ७८ हजार ४१ मतांची मोजणी झाली असता त्यात भाजपचे जयसिध्देश्वर शिवाचार्य यांना सर्वाधिक २ लाख २५ हजार ११२ मते मिळाली. तर सुशीलकुमार शिंदे यांच्या पारड्यात एक लाख ६८ हजार ४०१ मते मिळाली. प्रकाश आंबेडकर यांनी ७३ हजार ५९२ मते मिळविली आहेत. भाजपला ५६ हजार ७११ मतांची आघाडी मिळाली आहे. भाजपला प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी पथ्यावर पडल्याचे तर काँग्रेसचे नुकसान करणारी असल्याचे दिसून येते.

    13:15 (IST)23 May 2019
    उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित

    सातारा उदयनराजे भोसले यांचा बालेकिल्ला असून सुरुवातीपासूनच त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. उदयनराजे भोसले यांच्यासमोर शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचं आव्हान असून उदयनराजे भोसले ५० हजार मतांनी पुढे आहेत. उदयनराजे भोसलेंना 259198 मतं मिळाली असून नरेंद्र पाटील 206872 मतांनी पिछाडीवर आहेत.

    13:01 (IST)23 May 2019
    मुंबईत भाजपा कार्यालयाबाहेर विजयी जल्लोष
    12:59 (IST)23 May 2019
    सोलापुरात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, भाजपाचे जयसिद्धेश्वर स्वामी विजयाच्या वाटेवर

    सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण झालेल्या १० लाख ८१ हजार ३८६ (५८.४५ टक्के) मतदानापैकी आतापर्यंत 4 लाख सात हजार 726 मतमोजणी झाली आहे. यापैकी एक लाख 95 हजार 515 मतं जय सिद्धेश्वर स्वामी यांना मिळाली आहेत. तर सुशीलकुमार शिंदे यांना एक लाख 41 हजार 719 मतं मिळाली आहेत. प्रकाश आंबेडकर यांना 61 हजार 169 मतं मिळाली आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्यापेक्षा जय सिद्धेश्वर स्वामी यांना 53 हजार 796 मते अधिक मिळाली आहेत. अजून मतमोजणी सुरूच आहे.

    12:42 (IST)23 May 2019
    राज ठाकरेंवर आता मनोरंजन कर लावला पाहिजे: विनोद तावडे

    12:37 (IST)23 May 2019
    बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर

    बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय होईल असं चित्र सध्या आहे. कांचन कुल यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती, मात्र नंतर सुप्रिया सुळे पुन्हा त्यांना पिछाडीवर टाकलं. सुप्रिया सुळे ४ लाख २० हजार ४३५ मतांनी आघाडीवर असून ३ लाख ११ हजार १७४ मतांनी कांचन कूल पिछाडीवर आहेत.

    12:29 (IST)23 May 2019
    कोल्हापुरात निकालाआधीच संजय मंडलिक समर्थकांचा जल्लोष

    12:27 (IST)23 May 2019
    शिरूर लोकसभेच्या मतमोजणीवेळी काही वेळ तांत्रिक बिघाड

    शिरूर लोकसभेच्या मतमोजणीवेळी काही वेळ तांत्रिक बिघाड झाला होता. दुरुस्तीनंतर मतमोजणीला पुन्हा सुरुवात झाली आहे. शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हे आणि शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. अमोल कोल्हे सध्या 297846 मतांनी आघाडीवर आहेत. तर शिवाजीराव आढळराव पाटील 277792 मतांनी पिछाडीवर आहेत.

    12:22 (IST)23 May 2019
    औरंगाबादमध्ये नेमकी परिस्थिती काय? ब्युरो चिफ सुहास सरदेशमुख सांगत आहेत मतदारांचा कौल

    12:20 (IST)23 May 2019
    आशिष शेलार यांनी मानले जनतेचे आभार

    12:19 (IST)23 May 2019
    मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि शिरुरमधून अमोल कोल्हे आघाडीवर

    मावळ
    श्रीरंग बारणे - 461126
    पार्थ पवार - 313637

    शिरूर
    अमोल कोल्हे - 297846
    शिवाजी आढळराव - 277792

    12:05 (IST)23 May 2019
    उर्मिला मातोंडकर यांची ईव्हीएमविरोधात तक्रार

    उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार असणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी ईव्हीएमविरोधात तक्रार केली आहे. भाजपाच्या गोपाळ शेट्टींविरोधात उर्मिला मातोंडकर मैदानात असून पिछाडीवर आहेत. गोपाळ शेट्टी यांचा विजय नक्की मानला जात असून त्यांनी विजय साजरा करण्यासही सुरुवात केली आहे.

    12:02 (IST)23 May 2019
    उस्मानाबादमध्ये शिवसेनेची आघाडी

    आठव्या फेरीनंतर उस्मानाबादमध्ये शिवेसनेच्या ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घेतली आहे. ओमराजे निंबाळकर 1 लाख 92 हजार 898 मतांनी आघाडीवर आहेत. राणा जगजित सिंह पाटील 1 लाख 50 हजार 434 मतांनी पिछाडीवर आहेत. 30 हजार 736 मतांनी तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर आहेत.

    महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स येथे वाचा
    मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Maharashtra lok sabha election live updates
    First published on: 23-05-2019 at 08:18 IST