लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने महाराष्ट्रात फक्त सर्वाधिक जागाच जिंकलेल्या नाहीत तर अनेक जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत मोठे मताधिक्यही मिळवले आहे. २०१४ प्रमाणे २०१९ मध्येही भाजपा-शिवसेना युतीने ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून समोर आलेल्या तपशीलानुसार भाजपा-शिवसेना युतीने लोकसभेच्या १६ जागांवर तब्बल २ लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला आहे.

यामध्ये नऊ शहरी लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील पाच तर पुणे, मावळ, नाशिक आणि नागपूर या चार लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी झाले. मुंबई उत्तर, उत्तर-पूर्व मुंबई, मुंबई उत्तर-पश्चिम ठाणे आणि कल्याण हे मुंबई महानगर प्रदेशातील ते पाच लोकसभा मतदारसंघ आहेत. जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना युतीच्या उमेदवारांच्या जवळपासही पोहोचता आले नाही.

अकोला, धुळे, जालना, लातूर, रावेर, जळगाव आणि अहमदनगर या ग्रामीण भागातील सात मतदारसंघात युतीचे उमेदवार दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. १६ पैकी भाजपाने १२ आणि शिवसेनेने चार लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. महाराष्ट्रात ऑक्टोंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. युतीच्या उमेदवारांना मिळालेले हे मताधिक्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवणारे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला फक्त पाच जागांवर विजय मिळवता आला. सर्व निकाल एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच आले. काँग्रेस एक तर राष्ट्रवादीला चार जागांवर विजय मिळाला.