साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम हा देश भक्त होता आहे आणि राहिल अशी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याबाबत आता काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणारा माणूस देशभक्त? हे राम! अशा आशयाचे ट्विट करत प्रियंका गांधी यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहिल असं म्हणत त्याला दहशतवादी ठरवणाऱ्यांना धडा शिकवू असे म्हटले आहे. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहेत. आता काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हे राम असं म्हणत त्यांचा संताप समोर आणला आहे.

नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता अशी प्रतिक्रिया अभिनेते कमल हासन यांनी दिली होती. यासंदर्भात जेव्हा साध्वी प्रज्ञा यांना विचारण्यात आली तेव्हा त्या म्हटल्या की नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहिल. त्याला दहशतवादी ठरवणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ असाही इशारा साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी दिला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. साध्वी प्रज्ञा यांनी शहीद करकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद शमला न शमला तोच त्यांनी नथुरामला देशभक्त म्हटलं आहे.

साध्वी प्रज्ञा यांच्या या प्रतिक्रियेनंतर भाजपाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केली. आता काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करून त्यांचा संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा बाकी आहे. त्यात या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच नथुराम गोडसेचे नाव घेऊनही राजकारण रंगताना दिसतं आहे.