हिंदू हा शब्दच मुघल काळाआधी अस्तित्त्वात नव्हता. नथुराम गोडसे पहिला हिंदू दहशतवादी होता ही वादग्रस्त वक्तव्यं करणाऱ्या मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेते कमल हासन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले आहे. कमल हासन या शपथविधीला हजर रहाणार की नाही? हे समजू शकलेले नाही.

काही दिवसांपूर्वीच महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र हिंदुस्थानातला पहिला दहशतवादी होता असं वक्तव्य कमल हासन यांनी केलं होतं. आता कमल हासन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले ट्विट केले होते जे आता डिलिट करण्यात आले आहे. मात्र कमल हासन यांना मिळालेल्या निमंत्रणानंतर ते शपथविधीला जाणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हिंदू शब्दाबाबत काय म्हटले होते कमल हासन?
हिंदू या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन धर्मग्रंथात आढळत नाही असे म्हटले आहे. हिंदू हा शब्द विदेशी हल्लेखोरांनी आणि मुघलांनी दिला आहे. त्या शब्दाचा प्रयोग करण्यापेक्षा आपण भारतीय असेच संबोधन केले पाहिजे असेही मत त्यांनी नोंदवले आहे. हिंदू हा शब्द धर्मासाठी वापरणं गैर आहे आपण सगळे भारतीय आहोत. आपली ओळख भारतीयच असली पाहिजे.

तसेच नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातला पहिला हिंदू दहशतवादी होता असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा प्रत्येक धर्मात दहशतवादी असतात असेही वक्तव्य त्यांनी केले होते.