मालेगाव स्फोटातील मृताच्या वडिलांची न्यायालयाकडे मागणी

मुंबई : मालेगावमधील २००८च्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला लोकसभा निवडणूक लढवण्यास मनाई करण्याची मागणी स्फोटातील मृताच्या वडिलांनी गुरुवारी मुंबईतील विशेष न्यायालयाकडे केली. साध्वीला भाजपने भोपाळ येथून उमेदवारी जाहीर केली आहे.

आरोग्याच्या कारणास्तव साध्वीला जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु ती रखरखत्या उन्हात निवडणूक लढवण्यास ठणठणीत असेल तर तिने जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोपही स्फोटात मुलगा गमावलेल्या निसार सईद यांनी केला आहे.

सईद यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या(एनआयए) विशेष न्यायालयात गुरुवारी अर्ज करत साध्वीला लोकसभा निवडणूक लढण्यापासून मज्जाव करण्याची मागणी केली. खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे तिला निवडणूक लढवण्यास मनाई करावी. शिवाय जामिनावर बाहेर असलेल्या साध्वीला खटल्याच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश द्या, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

साध्वीचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. विशेष न्यायालयाचे न्या. व्ही. एस. पडाळकर यांनी सईद यांच्या अर्जाची दखल घेत ‘एनआयए’ आणि प्रज्ञासिंह हिला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.