लोकसभा निवडणुकींचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. दिल्लीमध्ये विविध पक्षांच्या बैठकीची सत्रे सुरु झाली आहे. एकंदरितच देशभरात चर्चा आहे ती फक्त आणि फक्त निवडणुकांच्या निकालाची. इंटरनेटवरही लोकसभेच्या निवडणुकांची चर्चा आहे. मात्र त्यातही विशेष म्हणजे सर्व एक्झिट पोलने भाजपाच्या पारड्यात मत टाकलेले असतानाच नेटकऱ्यांना मात्र ममता बॅनर्जींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. गुगल ट्रेण्ड्सनुसार आज (२२ मे २०१९) सकाळपासून भारतीयांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यापेक्षा ममता बॅनर्जी यांना अधिक जास्त प्रमाणात गुगलवर सर्च केले आहे. विशेष म्हणजे केवळ चार राज्यांमध्ये अमित शाह ममता बॅनर्जींपेक्षा जास्त वेळा सर्च झाले आहेत. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये जरी मोदी सरकरच्या बाजूने कौल पडला असला तरी इंटरनेटवर ममतांचीच चर्चा असल्याचे दिसत आहे.

ममता बॅनर्जी विरुद्ध अमित शाह</strong>

ममता बॅनर्जी यांनी भाजपाला बंगालमध्ये कडवे आवाहन दिले असल्याने त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची नेटकऱ्यांना अधिक उत्सुकता आहे. २२ मे च्या गुगल ट्रेण्डच्या डेटानुसार सकाळी पावणे सातपासून ते पावणे अकराच्या दरम्यान ममता दीदींनी गुगल सर्चच्या शर्यतीमध्ये चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसले. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामधून ममता बॅनर्जींसंदर्भात सर्वाधिक सर्च करण्यात आले. तर अमित शाह यांच्याबद्दल सर्वाधिक सर्च नागालॅण्ड आणि हिमाचल प्रदेशमधून झाले आहे.

ईशान्य भारतात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन तापलेले राजकारण, अमित शाहांच्या ताफ्यावर झालेलेली दगडफेक, ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपा असा सुरु असलेला राजकारण संघर्ष या पार्श्वभूमीवरच या नेत्यांबद्दल या राज्यांमधून सर्वाधिक सर्च होत आहे. महाराष्ट्रातही अमित शाहांपेक्षा ममता बॅनर्जींसंदर्भातील सर्च अधिक संख्येने आहेत.

अमित शाहांना टक्कर कन्हैया कुमारची

बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडणुक लढवणारे विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांच्याबद्दलही भारतीयांना बरीच उत्सुकता असल्याचे गुगल ट्रेण्ड्समधून दिसून येत आहे. निकालाच्या आधल्या दिवशी गुगल ट्रेण्ड्सवर कुमार यांच्याबद्दल चांगलीच चर्चा दिसून येत आहे. बेगुसराय मतदारसंघात भाजपचे उमेदवार अणि केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या कुमार यांच्याबद्दल सर्च होण्याचे प्रमाण अगदी अमित शाहांसंदर्भात होणाऱ्या सर्च इतकेच आहे.

अमित शाह, कन्हैया कुमार, ममता बॅनर्जी आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या संदर्भातील सर्चमध्ये ममता यांच्यासंदर्भात सर्वाधिक सर्च झाले असून त्या खालोखाल अमित शाहांचा क्रमांक असून कन्हैया कुमार तिसऱ्या तर साध्वी प्रज्ञा सिंह चौथ्या स्थानी आहेत.

गुगल ट्रेण्ड्सवर तरी सध्या सर्चच्या शर्यतीमध्ये काटें की टक्कर दिसून येत असली तरी निवडणुकीच्या खऱ्याखुऱ्या शर्यतीमध्ये कोण बाजी मारणार हे उद्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.