ममता बॅनर्जी, चंद्राबाबू आणि चंद्रशेखर राव यांचे महत्त्व वाढणार?

विशेष प्रतिनिधी

राष्ट्रीय राजकारणात महत्त्व वाढावे म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव या तीन मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

लोकसभेत अण्णा द्रमुक ३७, तर तृणमूल काँग्रेसचे ३४ खासदार निवडून आले होते. याशिवाय बिजू जनता दलाचे २०, शिवसेना १८, तेलुगू देशमचे १६, तेलंगणा राष्ट्र समितीचे ११, वायएसआर काँग्रेसचे ९ खासदार निवडून आले होते. भाजपकडे पूर्ण बहुमत असल्याने प्रादेशिक पक्षांना तेवढे महत्त्व प्राप्त झाले नव्हते. तेलुगू देशमने आंध्रला विशेष दर्जा मिळावा या मागणीवरून आक्रमक भूमिका घेतली होती, पण भाजपने चंद्राबाबूंकडे दुर्लक्ष केले. १९९९ मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात चंद्राबाबू नायडू यांना विशेष महत्त्व होते. चंद्राबाबूंच्या इशाऱ्यावर सरकार निर्णय घेत असे. २००४ ते २००९ या काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी सरकारमध्ये डावे पक्ष, लालूप्रसाद यादव, शरद पवार, द्रमुक आदी विविध नेत्यांच्या कलाने निर्णय घेतले जात होते.

लोकसभा निवडणुकीत बहुमताचा २७२ हा आकडा कोणालाही गाठता न आल्यास दिल्लीत प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढणार आहे. ममता बॅनर्जी यांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला शह देण्याकरिता भाजपने सारी ताकद लावली आहे. ममतादीदींनी भाजपला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. भाजपला सरकार स्थापन करणे शक्य झाले नाही आणि काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसल्यास पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ममता बॅनर्जी येऊ शकतात.

तेलंगणात पुन्हा सत्ता मिळाल्यावर चंद्रशेखर राव यांना दिल्लीचे वेध लागले आहेत. यामुळेच प्रादेशिक पक्षांचा महासंघ स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपला पुरेसे संख्याबळ मिळू न शकल्यास उपपंतप्रधानपद किंवा अन्य महत्त्वाचे खाते मिळावे, असा त्यांचा प्रयत्न असेल. चंद्राबाबू नायडू हे विरोधी नेत्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मतपावत्यांची मोजणीच्या मुद्दय़ावर चंद्राबाबू यांनीच सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. आंध्र प्रदेशची सत्ता कायम राखण्याचे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.

द्रमुक पुन्हा केंद्रस्थानी जयललिता यांच्या निधनाने अण्णा द्रमुकचा प्रभाव कमी झाला आहे. तमिळनाडूची सत्ता टिकविणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. तमिळनाडूत द्रमुकला यंदा चांगले यश मिळेल, असा अंदाज वर्तविला जातो. यामुळेच द्रमुक नेते हे भाजपबरोबर सत्ता स्थापण्यात महत्त्वाची भूमिका बजाविण्याच्या दृष्टीने चर्चा करीत असल्याचा गौप्यस्फोट भाजपच्या तमिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. अर्थात, स्टॅलिन यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांच्या भूमिकेकडे राजकीय नेत्यांचे लक्ष असेल. आंध्र प्रदेशात सत्ताबदल होणार आणि आपणच मुख्यमंत्री होणार, असा ठाम विश्वास जगनमोहन व्यक्त करीत आहेत. जगन यांच्या पक्षाचे १० ते १५ खासदार निवडून आल्यास त्यांचेही दिल्लीदरबारी महत्त्व वाढेल.

तीन नेत्यांवर भाजपची मदार

सरकार स्थापण्यासाठी संख्याबळ कमी पडल्यास ओदिशाचे नवीन पटनायक, तेलंगणाचे चंद्रशेखर राव आणि आंध्रमधील जगनमोहन रेड्डी यांची मदत घेण्याची भाजपची योजना आहे. या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या ६३ जागा आहेत. तिन्ही प्रादेशिक पक्षांचे संख्याबळ चांगले असल्यास त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो. ओदिशातील फॅनी वादळानंतर केंद्राने तातडीने मदत केली होती. तसेच पंतप्रधान मोदी यांनी पटनायक यांनी केलेल्या कामाचे कौतुकही केले होते. चंद्राबाबू नायडू यांनी भाजपची साथ सोडल्याने भाजपने जगनमोहन यांच्याशी पडद्याआडून समझोता केला आहे. चंद्रशेखर राव हे तर भाजपच्या विरोधात जात नाहीत हा अनुभव आहे.