दोन ठार, अनेक जखमी; पक्ष कार्यालये व कार्यकर्त्यांवर हल्ले

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर हिंसाचार उसळला असून, त्यात दोन जण ठार, तर अनेक जण जखमी झाले आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि वेगाने उदयाला आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षांच्या अनेक घटना राज्यभर घडल्या आहेत.

आपल्या पक्षाची अनेक कार्यालये भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकतर ताब्यात घेतली आहेत, किंवा त्यांची तोडफोड केली असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. कूचबिहारच्या सिताई, उत्तर २४ परगण्यातील टिटागड व कोलकात्यानजीकच्या न्यू टाऊन भागात भाजपच्या समर्थकांनी कथितरीत्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

कूचबिहारमधील बक्षिरहाट, महिष्कुची, रामपूर व शालबाडी भागातील आपल्या पक्ष कार्यालयांची भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केल्याचा, तसेच सितालकुची भागातील कार्यालयाचेही नुकसान केल्याचा आरोप तृणमूलने केला. निकाल जाहीर झाल्यापासून भाजप कार्यकर्त्यांनी एकतर आमच्या कार्यालयांना टाळे लावले आहे, किंवा त्यांची मोडतोड केली आहे किंवा त्यांना आग लावून दिली आहे, असे तृणमूलचे सितालकुची ब्लॉक अध्यक्ष आबिद अली मियाँ यांनी सांगितले.

भाजपने मात्र याउलट, विजयी मिरवणुकीदरम्यान बक्षिरकुटी भागात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला. आपल्या पक्षातील अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांवर  हल्ला करण्यात आल्याचे भाजपने सांगितले.याच जिल्ह्य़ाच्या सिताई भागात तृणमूलच्या महिला आघाडीच्या एका नेत्याच्या घरावर देशी बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोप तृणमूलने केला. बांकुरा जिल्ह्य़ातही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून, तेथे आपल्या एका स्थानिक नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला. सालतोरा भागात भाजपचे नेते बिद्युत दास (४२) हे शुक्रवारी सकाळी विजयी मिरवणुकीचे नेतृत्व करत असताना ही घटना घडल्याचे पक्षाने सांगितले. पोलिसांच्या उपस्थितीत तृणमूलचे स्थानिक नेते काली रॉय यांनी हल्ल्याचे नेतृत्व केल्याचा आरोप भाजपने केला.

राज्याच्या इतरही भागात तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयांची मोडतोड करण्याच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी परस्परांवर केला.

भाजप कार्यकर्त्यांची हत्या

कालयानी (पश्चिम बंगाल) : नादिया जिल्ह्य़ात एका २३ वर्षीय भाजप कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. या कार्यकर्त्यांचे नाव संतू घोष (२३) असे असून तो चाकदाहा शहरातील तापबन परिसरातील रहिवासी आहे. घोष याला दूरध्वनी आल्याने तो घराबाहेर आला असता त्याच्यावर अत्यंत जवळून गोळीबार करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.  या घटनेनंतर भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ रोखला, असे पोलिसांनी सांगितले. त्याचप्रमाणे नादिया जिल्ह्य़ात विविध ठिकाणी रेल्वेही रोखण्यात आली. पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला आहे, घोष याला आलेल्या दूरध्वनीवरून पोलिसांनी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.