मोदींचा करिष्मा तसेच तृणमूल काँग्रेसवर अल्पसंख्याकांचा अनुनय केला जात असल्याचा आरोप यामुळे मतदारांचे ध्रुवीकरण तसेच गेल्या वर्षी स्थानिक निवडणुकीनंतर झालेला हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल काँग्रेसला भोवला. त्यांचे संख्याबळ ३४ वरून २२ पर्यंत खाली आहे.

भाजपने राज्यात ४०.५ टक्के मतांसह १८ जागा जिंकल्या. गेल्या वेळी भाजपला १७ टक्के मते होती तर केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या. तृणमूल काँग्रेसने ३९ टक्क्य़ांवरून ४३ टक्के मते वाढविली असली आदिवासीबहुल जंगलमहल (दक्षिण बंगाल व चहा मळ्यांचा पट्टा) भागात त्यांना धक्का बसला आहे. भाजपची ही वाढ तात्कालिक आहे असे तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चटर्जी यांनी स्पष्ट केले. आम्हाला परिस्थितीचा अंदाज आला नाही. काय होणार हेच आम्हाला माहीत नव्हते, आता पक्ष संघटना एकत्रित ठेवणे कठीण असल्याची कबुली तृणमूलच्या एका नेत्याने दिली. तृणमूल काँग्रेसच्या पराभवाची जी काही कारणे त्यापैकी एक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर झालेला हिंसाचार. अनेक जणांना या निवडणुकीत मतदान करता आले नव्हते. स्थानिक पातळीवर भ्रष्टाचाराचे आरोप तृणमूलच्या खराब कामगिरीला कारणीभूत ठरले. तसेच भाजपच्या राष्ट्रवादाच्या प्रचाराचा मुकाबला करणे तृणमूलला शक्य झाले नसल्याची कबुली पक्षातील सूत्रांनी दिली. दुर्गा पूजेला तृणमूलचा विरोध असल्याचा आरोप झाला. त्यामुळे या गोष्टींना आम्हाला प्रत्युत्तर देता आले नाही हे तृणमूलच्या एका नेत्याने मान्य केले. डाव्या पक्षाच्या मतदारांची मोठय़ा प्रमाणात मते भाजपकडे वळाली. गेल्या निवडणुकीत डाव्यांना २९ टक्के मते होती ती यंदा सात टक्क्य़ांवर खाली आली. पुढील वर्षी नगरपालिका निवडणूक आहे तर विधानसभा निवडणुकीला दोन वर्षे आहेत. त्यापूर्वी तृणमूलपुढे पक्षात एकजूट राखण्याचे मोठे आव्हान आहे.

अनेक ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांनी भाजपला मदत केली आहे. आता या नाराज कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून विधानसभेसाठी अंतिम लढाईला सामोरे जाऊ.  – मुकुल रॉय, भाजप नेते

लोकसभा निकालाचे विधानसभानिहाय विश्लेषण केल्यास राज्यातील २९४ पैकी १३० विधानसभा मतदारसंघांत भाजपला आघाडी मिळाली आहे.