पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. बंगलाच्या डायमंड हार्बर येथील सभेत भाषण करताना मोदींनी आपल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली म्हणून अभिषेक बॅनर्जी यांनी ही नोटीस पाठवली आहे. भाजपा आणि तृणमुल काँग्रेसमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे.

कोलकात्यात अमित शाह यांच्या रोड शो मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर ही लढाई अधिकच तीव्र झाली आहे. या हिंसाचारामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यात एकदिवस आधीच प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला. अभिषेक बॅनर्जी तृणमुल काँग्रेसचे खासदार असून पक्षामध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे नेते समजले जातात.

डायमंड हार्बरमधून ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजपाच्या नीलांजन रॉय यांचे आव्हान आहे. डम डम, बारासात, बासीरहाट, जयनगर, माथुरपूर, जाधवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकात्ता या नऊ जागांवर उद्या शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.