पारनेर : लग्नात भेटवस्तू नको, परंतु आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉ. सुजयदादा विखे पाटील यांना जरूर मत द्या, अशी विनंती करणाऱ्या निघोज येथील फिरोज शेख या उच्चशिक्षित तरुणावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे!  नेतेमंडळींना खूश करण्यासाठी अतिउत्साहाच्या भरात फिरोजने केलेले हे कृत्य आचारसंहितेच्या कचाटय़ात सापडले आहे. लोकसभा निवडणूक निवासी  उपजिल्हाधिकारी श्री. पाटील तसेच पारनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या आदेशान्वये फिरते पथक अधिकारी शान मोहंमद शेख यांनी फिरोजविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी त्यास अटक  केली.

निघोज येथील निवृत्त पोस्टमास्तर अल्लाउद्दीन शेख यांचा मुलगा फिरोज याचा विवाह हसनापूर (ता. राहता) येथील रेहमान पठाण यांची मुलगी मोसिना हिच्याशी ३१ मार्च रोजी प्रवरानगर येथे पार पडला. या विवाहासाठी शेख यांनी छापलेल्या पत्रिकेमध्ये ‘किसी भी तरह का तोहफा मत दिजीए, मगर अपने सुनहरे कल के लिए डॉ. सुजय दादा विखे पाटीलजी को जरूर वोट दिजीए’ असे आवाहन करण्यात आले होते. फिरोज याने छापलेल्या या पत्रिकेची जिल्ह्य़ात चांगलीच चर्चा झाली. देशपातळीवरील नामांकित  वृत्तवाहिनीसह काही स्थानिक वृत्तपत्रांनीही त्याची दखल घेतली. विखे समर्थकांनीही सोशल मीडियावर फिरोजची पत्रिका अपलोड करून डॉ.  विखे यांच्यावर  कार्यकर्त्यांचे किती प्रेम आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला.

फिरोज याचे हे कृत्य लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या  आचारसंहिता कक्षातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आले. फिरोजच्या विवाहाची पत्रिका ताब्यात घेण्यात येऊन शान मोहंमद शेख यांनी गुरुवारी पहाटे पारनेर पोलिस ठाण्यात फिरोज याच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी पोलिसांना आदेश देत फिरोज यास ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस पथकाने तत्काळ कारवाई करीत त्यास अटक केली. त्यास पारनेर न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.