लोकसभा निवडणुकीच्या या वातावरणात राजकीय नेते एकमेकांवर अधिकाधिक धारदार आरोप करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सिंग हे काँग्रेसचे वॉचमन होते त्यांना देशाची नाही तर स्वतःच्या खुर्चीची चिंता होती, असा आरोप मोदींनी केला आहे. त्यांच्या धोरणांमुळे देश उद्ध्वस्त झाल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात प्रचार सभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, २००४ मध्ये काँग्रसचा राजकुमार काँग्रेसचे नेतृत्व संभाळण्याच्या स्थितीत नव्हता. स्वतः काँग्रेसला त्यांच्या राजकुमारावर भरवसा नव्हता. त्यामुळे या राजकुमाराला तयार होईपर्यंत गांधी कुटुंबाने आपल्या सर्वात विश्वासून चौकीदारला खुर्चीवर बसवण्याची योजना आखली. त्यांनी विचार केला की राजकुमार आज शिकेल, नंतर शिकेल मात्र, ते वाटच पाहत राहिले. भरपूर ट्रेनिंग दिल्यानंतरही त्यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी पडले.

काँग्रेसच्या या प्रयत्नात देशाची १० वर्षे उद्ध्वस्त, बरबाद झाली. मनमोहन सिंगाचा रिमोट कन्ट्रोल त्यांच्या स्वतः जवळ नव्हता तर दुसऱ्यांच्याजवळ होता. ते देशाची चिंता सोडून खुर्चीच्या चिंतेत व्यस्त होते. या दहा वर्षात देशाने असं सरकार पाहिल की जिकडे तिकडे नैराश्याचे वातावरण पसरले होते. शेवटी २०१४ मध्ये या लोकांना देशातील जनतेने बाहेर फेकून दिले.