06 December 2019

News Flash

छबी उमटविण्यासाठी मनोज कोटक यांची शर्थ

ईशान्य मुंबई आणि किरीट सोमैया हे समीकरण इतके पक्के आहे की कोटक यांची छबी मतदारांच्या मनावर बिंबवणे हेच मोठे आव्हान राहणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रचाराचे रंग-ढंग

ईशान्य मुंबईत शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून उमेदवार देताना घातला गेलेला गोंधळ मनोज कोटक यांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे प्रचाराच्या तोफा थंड होईस्तोवर आपणच महायुतीचे उमेदवार आहोत, हे ईशान्य मुंबईतील मतदारांच्या मनावर ठसविण्यात कोटक यांची सर्व शक्ती पणाला लागणार आहे. ईशान्य मुंबई आणि किरीट सोमैया हे समीकरण इतके पक्के आहे की कोटक यांची छबी मतदारांच्या मनावर बिंबवणे हेच मोठे आव्हान राहणार आहे.

सोमैय्यांऐवजी कोटक यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मुलुंडमधून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या कोटक यांची ओळख संपूर्ण मतदारसंघाला नाही. त्यातच प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर सोमैया सावलीप्रमाणे सोबत असलेले कोटक यंदाचे उमेदवार आहेत, हा संदेश महायुतीच्या कार्यकर्त्यांना विविध मार्गाने मतदारांपर्यंत पोहोचवावे लागत आहे. पदयात्रेनिमित्त युतीचे कार्यकर्ते मतदारसंघातील गल्लीबोळात शिरल्यानंतर मतदारांमध्ये नव्या उमेदवाराविषयीची उत्सुकता निर्माण झालेली असते.

कोटक हे रोज पहाटे उद्यान भेटीने प्रचाराला सुरुवात करतात. जॉगिंग ट्रॅकवर वा व्यायामाच्या ठिकाणी आलेल्या सर्व वयोगटांतील मतदारांशी ते संवाद साधत आहेत. त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेत आहेत. मतदारसंघातील एका रेल्वे स्थानकाबाहेरही ते प्रचारासाठी थांबत आहेत. बुधवारी त्यांनी मुलुंड स्थानकात पूर्वेकडे प्रचार केला. या वेळी सोमैया, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, शिवसेना नेते शिशिर शिंदे, दोन्ही पक्षांचे आजीमाजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी त्यांच्यासोबत होते.

उत्साही तरुणांनी उमेदवार, नेत्यांसोबत सेल्फीही घेतल्या. सकाळी घाईच्या वेळेतल्या दोन तासांमध्ये शेकडो प्रवाशांना पर्यायाने मतदारांना यंदा मी उमेदवार आहे, हे स्पष्टपणे सांगणारी कोटक यांनी अवलंबलेली पद्धत प्रत्यक्षात सोमैयांनी अनेक वर्षे वापरली. पक्षाने डावलले असले तरी कोटक यांनी सोमयांची परिणामकारक प्रचारशैली आत्मसात केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोटक यांनी बुधवापर्यंत उद्यान आणि रेल्वे स्थानक भेट न चुकता केली.

रेल्वे स्थानकातील प्रचार आटपून महायुतीच्या उपस्थित नेते, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शाखेत चहा घेतला. त्यानंतर महावीर जयंतीनिमित्त मुलुंड पश्चिमेकडे आयोजित एका कार्यक्रमात कोटक आणि सोबतचे भाजप पदाधिकारी सहभागी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि समाजसेविका अमृता फडणवीस या त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या.

या कार्यक्रमानंतर कोटक यांनी आपला मोर्चा घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील कामराजनगर, रमाबाई नगर येथील प्रचार यात्रेकडे वळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोटक यांची छायाचित्रे, स्वपक्षासह मित्रपक्षांच्या निवडणूक चिन्हांनी सजवलेल्या प्रचार रथावर कोटक आरूढ झाले. देवनार कचराभूमीला भिडू पाहणाऱ्या कामराजनगर झोपडपट्टीत ये-जा करण्यासाठी उपलब्ध असलेल्या एकमेव अरुंद रस्त्यावरून त्यांचा प्रचाररथ फिरला.

First Published on April 18, 2019 1:32 am

Web Title: manoj kotak their picture on voter implicitly
Just Now!
X