महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पराभवाच्या धक्क्यात आहे. कारण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली आहे. अशात आता १ जून ते ६ जून या आठवड्यात राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठवाड्यातून एक आमदार, पश्चिम महाराष्ट्रातून एक आमदार, मुंबईतून एक आमदार आणि राधाकृष्ण विखे पाटील जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपात प्रवेश करतील अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे आणि अब्दुल सत्तार हे तिघेही विखे पाटील यांच्यासोबत भाजपात जाण्याची चिन्हं आहेत. तर आणखी दोन आमदारही भाजपात जाणार असे बोलले जाते आहे मात्र त्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक गुप्त बैठक घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे त्यांच्याकडे सर्वाधिकार आहेत असं अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझा या वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था दारूण झाली आहे. अवघी एक जागा काँग्रेसला जिंकता आली आहे. सुजय विखे पाटील हे भाजपात गेल्याने राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपात जातील अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. आता सुजय विखे पाटील भाजपाच्या तिकिटावर निवडूनही आले आहेत. अशात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चार आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी हा धक्काच मानला जातो आहे.