पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे राज्यभर प्रचार सभा घेत असले तरी काही दिवसांपासून ठाणे लोकसभा मतदारसंघात ‘थांबा आणि पहा’ अशी भूमिका घेणारे मनसेचे पदाधिकारी येत्या रविवारपासून आघाडीच्या जाहीर प्रचारात उतरणार आहेत.

येत्या २३ वा २४ एप्रिल रोजी राज यांची सभा ठाण्यात होणार असून राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा मनसेकडून जाहीर प्रचार केला जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

मनसेने जिल्हा पातळीवरील कार्यकर्ते मात्र आघाडीच्या प्रचारात उतरलेले नव्हते. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक आणि जीतेंद्र आव्हाड यांच्या मध्यंतरी भेटी घेतल्या. त्यानंतरही मनसे कार्यकर्ते आघाडीच्या जाहीर प्रचारात सक्रिय झाले नव्हते. कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेतील एका मोठय़ा गटाचा आघाडीचा प्रचार करण्यास विरोध आहे.

दरम्यान  मनसेच्या ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईदर भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ठाण्यात झालेल्या बैठकीनंतर रविवार, २१ एप्रिलपासून आनंद परांजपे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याआधी कल्याणमधील पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मध्यंतरी गणेश नाईक यांची भेट घेऊन चर्चा केली होती.