गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या १५८

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यासाठी सध्या देशभरातून ९४३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत, त्यापैकी ३०६ उमेदवारांची मालमत्ता १ कोटी रुपयांहून अधिक आहे. आतापर्यंत पार पडलेल्या तीन टप्प्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वात कमी आहे. प्रियांका शिरोळे, विठ्ठल चव्हाण, प्रेम बंशीवाल या महाराष्ट्रातील अपक्ष उमेदवारांनी आपली मालमत्ता शून्य असल्याचे सांगितले आहे. १५८ उमेदवारांवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, तर २१ उमेदवारांवर महिलांविरोधातील गुन्ह्य़ांची नोंद आहे.

प्रत्येक उमेदवाराची सरासरी मालमत्ता ४.५३ कोटी रुपये इतकी आहे. त्यातही काँग्रेसच्या ५४ उमेदवारांची मालमत्ता सरासरी २९ कोटींहून अधिक आहे. काँग्रेसचे ५०, भाजपचे ५०, बसपचे २० उमेदवार कोटय़धीशांच्या यादीत समाविष्ट आहेत.

मध्य प्रदेशच्या चिंदवारा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नकुल नाथ ६६० कोटींहून अधिक मालमत्तेसह पहिल्या क्रमांकावर आहेत. उत्तर-मध्य मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचे वार्षिक उत्पन्न सर्वाधिक म्हणजेच १३ कोटींहून अधिक आहे.

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे २०, काँग्रेसचे ९, बसपचे १० आणि ४५ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. किरकोळ गुन्हे दाखल असलेल्यांची संख्या २१० आहे.

४ उमेदवारांवर अपहरण, ५ जणांवर खून आणि २४ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. भडकावू भाषणांशी संबंधित गुन्हे दाखल असलेल्यांची संख्या १६ आहे. एखाद्या मतदारसंघात ३ किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्यास तेथे रेड अलर्ट जाहीर केला जातो. यानुसार ७१ पैकी ३७ मतदारसंघांत रेड अलर्ट जाहीर झाला आहे.